Rohit Sharma Stand Ticket Price DC vs MI IPL 2025 Match: मुंबईचा राजा रोहित शर्माचं नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील स्टँडला देण्यात आलं आहे. आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्माच्या नावाचं १६ मे रोजी उद्घाटन करण्यात आलं. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये जिथे तो खेळत लहानाचा मोठा झाला, तिथे एका स्टँडला त्याचं नाव देण्यात आलं आहे. हा क्षण अनुभवाताना रोहितसह त्याचं संपूर्ण कुटुंब भावुक झालं होतं.
आता रोहित शर्माच्या नावाच्या या स्टँडमध्ये बसून रोहितची फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना २१ मे रोजी वानखेडेच्या मैदानावर होणार आहे. पण या स्टँडमध्ये बसून आयपीएल सामना पाहण्यासाठी तिकिटासाठी किती पैसे खर्च करावे लागतील? जाणून घेऊया.
२१ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. रोहित शर्मा स्टँडच्या उद्घाटनानंतर या ऐतिहासिक मैदानावर हा पहिलाच सामना असेल. या वेळी, चाहते स्टँडमध्ये बसून रोहित शर्माच्या फलंदाजीचा आनंद घेऊ शकतात. वानखेडे स्टेडियमवरील दिवेचा पॅव्हेलियनच्या लेव्हल थ्री स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्यात आले आहे.
रोहित शर्मा स्टँडचं पहिले तिकीट स्वतः एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी रोहितला दिले. या तिकिटावर रोहित शर्मा स्टँड लिहिलेलं आहे आणि या तिकिटाची किंमत किती आहे हे देखील नमूद केलं आहे. जर चाहत्यांना या स्टँडचे तिकिट घ्यायचे असेल तर त्यांना ९९९ रुपये (टॅक्ससह) खर्च करावे लागतील. यानंतर, २१ मे रोजी, रोहित शर्मा स्टँडवर बसून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ शकतात. हे तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१६ मे रोजी वानखेडेच स्टेडियममध्ये झालेल्या उद्घाटन समारंभात रोहित शर्मा त्याची पत्नी, आई-वडिल, भाऊ त्याची पत्नी यासह उपस्थित होते. यावेळी रोहितही बोलताना खूप भावुक झाला होता. रोहित स्टँडच्या अनावरणापूर्वी म्हणाला, “आज जे होणार आहे, याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. लहानपणापासूनच मला मुंबईसाठी, टीम इंडियासाठी खेळायचं होतं. क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये आपलं नाव असणं, याचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. हे देखील खास आहे कारण मी अजूनही क्रिकेट खेळत आहे”.