IPL 2025 Jitesh Sharma : आयपीएलच्या १८ व्या हंगामाचा अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ जूनला खेळवण्यात आला. हा सामना विराट कोहलीच्या आरसीबीसाठी सर्वार्थाने खास ठरला कारण, पंजाब किंग्जवर ६ रन्सनी मात करत RCB ने तब्बल १७ वर्षांनी IPL ट्रॉफीला गवसणी घातली. यावेळी विराट कोहलीला मैदानावरच अश्रू अनावर झाले होते.
विराट पहिल्या हंगामापासून आरसीबी टीमचा भाग आहे आणि गेली १७ वर्षे या टीमकडे ट्रॉफी नव्हती. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने या विजयाचं श्रेय विराटला दिलं. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने देखील हा विजय विराट कोहली व आमच्या टीमच्या लाखो चाहत्यांचा आहे असं सांगितलं. सध्या सर्व स्तरांतून आरसीबीचं कौतुक करण्यात येत आहे. चाहते विराटसाठी खास पोस्ट शेअर करत आहेत. आता, RCB चा फलंदाज व यष्टीरक्षक जितेश शर्माने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
खरंतर, यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी जितेश शर्माने एका पॉडकास्टमध्ये आरसीबीच्या सर्व चाहत्यांसाठी सकारात्मक मेसेज दिला होता. “यंदा काहीही काळजी करू नका, मी जितेश शर्मा…सगळ्या गोष्टींची काळजी घेईन, तुमच्यासाठी आम्ही ट्रॉफी जिंकणार, तुम्ही निश्चिंत राहा” असं त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
याशिवाय मार्चमध्ये आरसीबीच्या ताफ्यात सामील झाल्यावर जितेशने ड्रेसिंग रूमच्या काचेवर एक खास इच्छा आधीच लिहून ठेवली होती. “आम्ही यंदा विराट भाईबरोबर ट्रॉफी जिंकणार, चषकासह फोटो काढताना विराट भाई डाव्या बाजूला असतील आणि DK अण्णा देखील माझ्याबाजूला उभे राहतील. अंतिम सामन्यात आमच्या संघाला २ बॉलमध्ये ६ रन्सची आवश्यकता असेल आणि मी सिक्स मारून विजयोत्सव साजरा करेन…माझी ही इच्छा २०२५-२६ च्या आयपीएलला पूर्ण होऊदेत. फिंगर्स क्रॉस” २ महिन्यांपूर्वीच जितेशने आरसीबीने ट्रॉफी जिंकावी असं मॅनिफेस्ट केलं होतं आणि त्याचं स्वप्न ३ जूनला साकार झालं आहे.
RCB च्या विजयानंतर जितेश शर्माने आधीच ठरवल्याप्रमाणे विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्यासह ट्रॉफी घेऊन फोटो काढलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो लिहितो, “पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन, डावीकडे विराट भाई आणि उजवीकडे डीके अण्णा आणि मध्ये आमची ट्रॉफी…मार्चमध्ये जेव्हा मी आरसीबीच्या संघात सामील झालो तेव्हा मला स्वतःसाठी किंवा संघासाठी काहीतरी मॅनिफेस्ट करायला सांगितलं होतं तेव्हाच हा क्षण मी लिहून ठेवला होता…आज आमचं स्वप्न साकार झाल्यावर मी प्रचंड आनंदी झालोय.”
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या होत्या. बंगळुरूने पंजाबसमोर १९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठण्यात श्रेयर अय्यरच्या संघाला अपयश आलं आणि तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं.