IPL 2025 KKR vs RR Highlights: कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सविरूद्ध अखेरच्या चेंडूवर एका धावेने विजय मिळवत आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना आंद्रे रसेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २०५ धावा केल्या होत्या. तर रियान परागच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर हे लक्ष्य गाठले होते पण अखेरच्या षटकात पराभव पत्करावा लागला.
हर्षित राणाने १८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रियान परागला झेलबाद केलं. रियान पराग मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ९५ धावा करत बाद झाला. रियान पराग ४५ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांसह ९५ धावा करत झेलबाद झाला. अवघ्या ५ धावांसाठी त्याचं शतक हुकलं. यानंतर शुभम दुबेने अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी केली खरी पण संघ एक धावेने पराभूत झाला.
KKR vs RR Live: हेटमायर झेलबाद
रियान परागबरोबर चांगली फटकेबाजी केल्यानंतर शिमरोन हेटमायर १६ व्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
KKR vs RR Live: रियान परागची फटकेबाजी
रियान परागने मोईन अलीच्या १३व्या षटकात ५ षटकार लगावत ३४ धाव कुटल्या. रियानने वादळी फटके लगावत मोईन अलीच्या एका षटकात सामना राजस्थानच्या बाजूने फिरवला आहे. राजस्थान आता बाजी मारणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.
KKR vs RR Live: दोन विकेट
आठव्या षटकात वरूण चक्रवर्तीने तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. वरूणने आधी ध्रुव जुरेलाला गोल्डन डकवर क्लीन बोल्ड केलं. तर पाचव्या चेंडूवर हसरंगा दुसरा चेंडू खेळत क्लीन बोल्ड झाला. यासह राजस्थानने दोन विकेट्स गमावले.
KKR vs RR Live: पॉवरप्लेनंतर विकेट
यशस्वी आणि रियान परागने संघाचा डाव सावरत २ बाद ५६ धावा केल्या. पण पॉवरप्लेनंतर पुढच्या षटकात मोईन अलीने यशस्वी जैस्वालला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
KKR vs RR Live: पदार्पणवीर झेलबाद
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करणारा कुणाल सिंग राठोड खातेही न उघडता झेलबाद झाला. मोईन अलीने दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कुणालला झेलबाद केलं.
KKR vs RR Live: वैभव सूर्यवंशी झेलबाद
पहिल्या षटकात चौकार मारत वैभवने चांगली सुरूवात केली पण पुढच्याच चेंडूवर वैभव अरोराने त्याला झेलबाद केले. वैभव सूर्यवंशी षटकार लगावयाला गेला आणि रहाणेने मागे धावत जाऊन एक कमालीचा झेल टिपला.
केकेआरने आंद्र रसेल आणि अखेरच्या षटकातील रिंकू सिंगच्य वादळी फटकेबाजीच्या जोरावर ४ बाद २०६ धावांचा टप्पा गाठला. रिंकू सिंगने आकाश मधवालच्या अखेरच्या षटकात २२ धावा केल्या तर रसेलने १९व्या षटकात १२ आणि १८व्या षटकात २३ धावा करत ईंडन गार्डन्सवर वादळी फटकेबाजी केली. राजस्थानने विकेट्स घेत केकेआरच्या धावांवर अंकुश ठेवला खरा पण आंद्रे रसेलने येताच विस्फोटक अंदाजात संघाला धावा करून दिल्या.
KKR vs RR Live: रसेलची फटकेबाजी
आंद्र रसेल पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात दिसला असून तो वादळी फटकेबाजी करत आहे. रसेलने तीक्ष्णाच्या १८व्या षटकात षटकारांची हॅटट्रिक लगावत २३ धावा कुटल्या. यासह रसेलने २२ चेंडूत ६ षटकार आणि ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली.
रियान परागने १३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला झेलबाद केलं. रियानच्या खात्यात मोठी विकेट मिळाली आहे. रहाणे २४ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह ३० धावा करत बाद झाला. यासह १३ षटकांत केकेआरने ३ बाद १११ धावा केल्या.
गुरबाज झेलबाद
तीक्ष्णाने आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झटपट धावा करणाऱ्या गुरबाजला झेलबाद केले. गुरबाज २५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा करत बाद झाला.
KKR vs RR Live: पॉवरप्ले
केकेआरने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावली असली तरी चांगली धावसंख्या उभारली आहे. रहाणे आणि गुरबाजने पॉवरप्लेमध्ये १ बाद ५६ धावा केल्या आहेत.
KKR vs RR Live: पहिली विकेट
युधवीर सिंग चरक सामन्यातील दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकात नरेनने चौकार-षटकार लगावले. पण अखेरीस तो शेवटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यासह राजस्थानला पहिली विकेट मिळाली.
KKR vs RR Live: राजस्थानची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोर, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्ष्णा, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल
KKR vs RR Live: केकेआरची प्लेईंग इलेव्हन
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याची नाणेफेक केकेआरने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केकेआरच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रमणदीप आणि मोईन अली परतले आहेत. तर राजस्थानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ बदल आहेत. नितीश राणा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तर हसरंगा संघात परतलाय. कुणाल राठोड आणि युद्धवीर सिंग खेळताना दिसणार आहेत.
KKR vs RR Live: दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३१ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान १५ सामने जिंकता आले आहेत. तर राजस्थानने १४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर २ सामन्यांचा निकाल लागू शकला नव्हता.