Suryakumar Yadav Searches Ball Funny Video: आयपीएलच्या ५० व्या सामन्यात गुरूवारी मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघाचा १०० धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत प्रथम स्थान पटकावले तर राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या खेळाकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र तो शून्यावर बाद झाला. राजस्थानचा संपूर्ण संघ १६ षटकांत केवळ ११७ धावाच करू शकला. मात्र राजस्थानची फलंदाजी सुरू असताना मैदानात गल्ली क्रिकेटसारखा एक मजेशीर प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थानची फलंदाजी सुरू असताना नवव्या षटकात ध्रुव जुरेलने करण शर्माच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार लगावला. सीमारेषेबाहेर गेलेला चेंडू आणण्यासाठी तिथे क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेला सूर्यकुमार यादव धावून गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो तिथेच घुटमळत होता. षटक पूर्ण करण्यास उशीर होत असल्यामुळे नमन धीरही त्याच्या मदतीसाठी धावून आला. पण चेंडू काही सापडत नव्हता.
आयपीएलचा सामना प्रक्षेपित करणारे कॅमेरामन जिथे बसले होते. त्याठिकाणी सामानात चेंडू पडला होता. मात्र वेळेत चेंडू न सापडल्यामुळे पंचानी करण शर्माला दुसरा चेंडू दिला आणि षटक पूर्ण करण्यास सांगितले. षटक सुरू व्हायला लागले तरी सूर्यकुमार मात्र अनक्षिज्ञपणे चेंडू शोधण्यात मग्न होता. मग त्याला क्षेत्ररक्षणासाठी परतण्यास सांगण्यात आले. तोपर्यंत हरवलेला चेंडूही सापडला.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून गल्ली क्रिकेटप्रमाणेच आयपीएलमध्येही चेंडू गमावल्यावर शोधाशोध करावी लागते, अशी चर्चा होत आहे. त्याचप्रकारे चेंडू सापडत नसल्यामुळे गोंधळेला सूर्यकुमारही या व्हिडीओत दिसत आहे.
सूर्यकुमारची बॅट तळपली
मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत असताना सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याने २३ चेंडूत फटकेबाजी करत ४८ धावांची खेळी साकारली. या खेळीमुळे आता त्याने ऑरेंज कॅपही पटकावली आहे.
मुंबई इंडियन्सने राजस्थानला २१८ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानचा संघ १६ षटकांत ११७ धावा करत सर्वबाद झाला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना फार वेळ मैदानावर टिकू दिले नाही. पहिल्याच षटकात दीपक चहरने१४ वर्षीय शतकवीर वैभव सूर्यवंशीला बाद केले. तर दुसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने दोन षटकार खाल्ल्यानंतर यशस्वी जैस्वालला क्लीन बोल्ड केले. यानंतर नितीश राणाला बोल्टने ९ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर आलेले रियान पराग, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे आणि ध्रुव जुरेल हे फलंदाजही समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत.
जोफ्रा आर्चरने राजस्थानकडून सर्वाधिक धावा केल्या. आर्चरने २७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.