IPL 2025 Playoffs Four Teams Decided: आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफचे चार संघ ठरले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये पाच संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. तर ३ संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. यानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये प्लेऑफसाठी नॉकआऊट सामना खेळला गेला. यामध्ये मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर दिल्लीचा पराभव केला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि यासह त्यांनी आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ १८.२ षटकांत फक्त १२१ धावा करू शकला.
मुंबईच्या विजयाचे हिरो सूर्यकुमार यादव, बुमराह आणि सँटनर ठरले. सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. तर फलंदाजीसाठी कठिण असलेल्या खेळपट्टीवर नमन धीरने मोठे फटके लगावत मोठं योगदान दिलं. यानंतर, गोलंदाजीत, मिचेल सँटनरने ४ षटकांत ११ धावा देत ३ विकेट घेतले. बुमराहनेही १२ धावा देऊन ३ विकेट घेतले.
मुंबई इंडियन्सचा संघ या विजयासाठी आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी क्वालिफाय ठरला. मुंबई इंडियन्सशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे संघ क्वालिफाय झाले होते. अजून लीग टप्प्यातील सामने बाकी आहेत. हे सामने संपल्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होईल.
प्लेऑफमध्ये पहिला सामना क्वालिफायर १ आणि दुसरा सामना एलिमिनेटर मध्ये होईल. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ पहिला क्वालिफायर सामना खेळतील. तर एलिमिनिटेरमध्ये दुसरा आणि तिसरा संघ खेळेल, हे दोन्ही सामने न्यू चंदीगडमध्ये होतील. तर क्वालिफायर २ सामना क्वालिफायर १ चा पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजयी संघ यांच्यात होईल. तर क्वालिफायर १ चा विजेता आणि क्वालिफायर २ चा विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. हे दोन्ही सामने अहमदाबाद मध्ये होतील.
यंदाच्या प्लेऑफमध्ये २ संघ असे आहेत, ज्यांनी आजवर कधीच आयपीएलचे जेतेपद पटकावलेलं नाही. आरसीबी आणि पंजाब संघाला जेतेपद जिंकण्याची यंदा संधी आहे. तर गुजरातचा संघ दुसरे जेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सची नजर ऐतिहासिक सहाव्या जेतेपदावर असेल.
IPL 2025 Playoffs Schedule: आयपीएल २०२५ प्लेऑफचं वेळापत्रक
२९ मे २०२५ – क्वालिफायर १- गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये – मुल्लानपूर, न्यू चंदीगढ
३० मे २०२५- एलिमिनेटर- गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये – मुल्लानपूर, न्यू चंदीगढ
१ जून २०२५ – क्वालिफायर २- क्वालिफायर १चा पराभूत संघ वि. एलिमिनेटरचा विजेता – अहमदाबाद
३ जून २०२५ – अंतिम सामना – दोन्ही क्वालिफायरचे विजेते संघ – अहमदाबाद