IPL Playoffs Qualifications Scenario For All Teams: आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच स्पर्धेतील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते, हे कळेल. प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं समीकरण आणखी गुंतागुंतीच होत चाललं आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईचा संघ सर्वात आधी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. मात्र, या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान कोणते ४ संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात? जाणून घ्या.
सर्व संघांना प्लेऑफ गाठण्यासाठी १८ गुणांपर्यंत पोहचावं लागणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला टॉप २ मध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या ११ सामन्यांमध्ये १६ गुणांची कमाई केली आहे. पुढील तिन्ही सामने जिंकून हे दोन्ही संघ २२ गुणांपर्यंत पोहोचू शकतात.
पंजाब किंग्ज (१५ गुण) आणि मुंबई इंडियन्सला (१४ गुण) देखील प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी आहे. या दोन्ही संघांना पुढील २ सामने जिंकायचे आहेत. पंजाबचे आणखी ३ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे पंजाबला ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील. तर मुंबईचे आणखी २ सामने शिल्लक आहेत. मुंबईला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. मुख्य बाब म्हणजे, मुंबईचा एक सामना पंजाबविरूद्ध होणार आहे. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने सुरूवातीला दमदार खेळ केला. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये या संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दिल्लीने ११ सामन्यांमध्ये १३ गुणांची कमाई केली आहे. दिल्लीला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर पुढील तिन्ही सामने जिंकावे लागतील. हे तिन्ही सामने गुणतालिकेत टॉप ४ मध्ये असलेल्या संघांविरूद्ध होणार आहेत. त्यामुळे दिल्लीसाठी इथून पुढचा प्रवास मुळीच सोपा नसेल.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. कारण चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी कोलकातासाठी प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण सोपं होतं. कोलकाताला उर्वरीत तिन्ही सामने जिंकायचे होते. त्यानंतर इतर संघांच्या निकालावर कोलकाता नाईट रायडर्सचं भवितव्य ठरणार होतं. मात्र, कोलकाताला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाबद्दल बोलायचं झालं, तर लखनऊने ११ सामन्यांमध्ये १० गुणांची कमाई केली आहे. लखनऊसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नाही. उर्वरीत ३ सामने जिंकून हा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, त्यानंतर या संघाला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.