IPL 2025 Restart Date And Venue: भारत आणि पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेतील फायनलचा सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र, आता बीसीसीआय ही स्पर्धा आणखी पुढे खेचणार असल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार स्पर्धेतील फायनलचा सामना ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो. या स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना १६ मे पासून सुरूवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर या स्पर्धेतील सामने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी ५८ सामने पूर्ण झाले आहेत. तर १६ सामने अजूनही शिल्लक आहेत. ज्यात प्लेऑफच्या सामन्यांसह फायनलचा देखील समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या स्पर्धेचे सुधारीत वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत जाहीर केले जाऊ शकते. त्यामुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
बीसीसीआयच्या एका सुत्राने माहिती देताना म्हटले की, ” आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याने, आयपीएलचा फायनलचा सामना आता २५ ऐवजी ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो. ही स्पर्धा आता मर्यादीत ठिकाणी खेळवली जाऊ शकते. आज रात्रीपर्यंत सर्व संघांना वेळापत्रक पाठवले जाईल.”
बीसीसीआयने पंजाब किंग्ज संघाला वगळता इतर सर्व संघातील खेळाडूंना येत्या मंगळवारपर्यंत आपापल्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. कारण शुक्रवारपर्यंत आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते. काही संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य मायदेशी परतले आहेत. आता त्या खेळाडूंना पुन्हा बोलवण्याचे आदेश बीसीसीआयने फ्रँचायझींनी दिले असल्याचे म्हटले जात आहे.
गुरूवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यातील पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर बीसीसीआयने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आधी स्टेडियमच्या लाईट्स बंद करण्यात आल्या. त्यानंतर प्रेक्षकांना मैदानाबाहेर पाठवण्यात आलं आणि हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत. आता परदेशात गेलेल्या खेळाडूंना परत आणण्याचं मोठं आव्हान बीसीसीआय आणि फ्रँचायझींसमोर असणार आहे.