मुल्लानपूर : युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीच्या (२९ चेंडूंत ९७) तुफानी फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात बुधवारी सनरायजर्स हैदराबादवर ४७ धावांनी विजय मिळवत ‘आयपीएल’मधील आव्हान शाबूत राखले. राजस्थानला शुक्रवारी ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात गुजरात टायटन्सला सामोरे जावे लागेल. यातील विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर येथील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर सूर्यवंशीने हैदराबादला पूर्णपणे निष्प्रभ केले. सूर्यवंशीच्या खेळीमुळे राजस्थानला २० षटकांत ८ बाद २४३ धावांची मजल मारता आली. यानंतर जोफ्रा आर्चरने भेदक मारा करताना अभिषेक शर्मा (०), ट्रॅव्हिस हेड (१७) आणि इशान किशन (३३) या हैदराबादच्या अव्वल तीन फलंदाजांना झटपट माघारी धाडले. हेन्रिक क्लासनही (१८) अपयशी ठरला. नितीश रेड्डी (३८) आणि सलिल अरोरा (३५) यांनी प्रतिकार केला. मात्र, हैदराबादचा डाव १९६ धावांत संपुष्टात आला व ते स्पर्धेबाहेर झाले.

त्याआधी १५ वर्षीय सूर्यवंशीने चौफेर फटकेबाजीने सर्वांत थक्क करून सोडले. त्याने अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यात आठ षटकारांचा समावेश होता. त्याने कमिन्सच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकारही खेचले. त्याला ख्रिस गेलचा (३० चेंडू) सर्वांत जलद ‘आयपीएल’ शतकाचा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र, आपल्या डावातील २९व्या चेंडूवर तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल (५०), यशस्वी जैस्वाल (२९) आणि कर्णधार रियान पराग (२६) यांनीही योगदान दिल्याने राजस्थानला २४० धावांचा टप्पा ओलांडता आला.

षटकारांचा विक्रम…

सूर्यवंशीने हैदराबादविरुद्धच्या लढतीत १२ षटकार ठोकले. यंदाच्या हंगामात १५ सामन्यांत मिळून त्याचे ६५ षटकार झाले आहेत. त्यामुळे त्याने ‘आयपीएल’च्या एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने २०१२च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळताना ५९ षटकार मारले होते.