नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अहमदाबादप्रेम कायम असून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्याचे आयोजन हक्क पाच वर्षांत चौथ्यांदा ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ला मिळाले आहेत. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या मैदानावर यंदाचा अंतिम सामना अपेक्षित होता. मात्र, जेतेपदाची लढत खेळवण्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता करण्यात कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला अपयश आल्याने सामना अहमदाबाद येथे हलविणे भाग पडल्याचे स्पष्टीकरण ‘बीसीसीआय’कडून देण्यात आले आहे.

धरमशालात प्रथमच…

‘आयपीएल’च्या ‘प्ले-ऑफ’ लढतींचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. यंदा ‘प्ले-ऑफ’ लढती २६ मेपासून तीन वेगवेगळ्या मैदानांवर खेळवल्या जाणार आहेत. साखळी फेरीतील ७० सामने संपल्यानंतर अव्वल दोन संघांमधील ‘क्वालिफायर-१’ सामना २६ मे रोजी धरमशाला येथील ‘एचपीसीए’ स्टेडियमवर होईल. पंजाब किंग्ज संघाचे दुसरे घरचे मैदान असलेल्या धरमशालात प्रथमच ‘प्ले-ऑफ’ लढत होणार आहे. यानंतर २७ मे रोजी ‘एलिमिनेटर’ सामना न्यू चंडीगड (मुल्लानपूर) येथे होईल. त्याच मैदानावर २९ मे रोजी ‘क्वालिफायर-२’ लढत खेळवली जाईल. मग अंतिम लढत ३१ मे रोजी अहमदाबादेत होईल.

गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे घरचे मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियमला अंतिम सामन्याचे यजमानपद देण्यात आलेले नाही. ‘‘अंतिम सामन्यासाठी सुरुवातीला बंगळूरुची निवड करण्यात आली होती. मात्र, स्थानिक संघटना आणि प्रशासनाकडून काही अशा मागण्या करण्यात आल्या, ज्या आमच्या नियमांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे हा सामना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘नरेंद्र मोदी स्टेडियमची एक लाख ३२ हजार आसनक्षमता लक्षात घेऊन अंतिम सामना तेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित राहू शकतात, त्यामुळे महसूलही वाढतो,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांचे म्हणणे आहे.

कर्नाटक क्रिकेट संघटनेची नाराजी

* ‘आयपीएल’चा अंतिम सामना बंगळूरुबाहेर हलविण्याच्या ‘बीसीसीआय’च्या निर्णयावर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) नाराजी दर्शवली आहे. या हंगामाच्या सुरुवातीला ‘केएससीए’चे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी बंगळूरुत सात सामने होणार असल्याचे सांगितले होते. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे पाच सामने, तसेच एक ‘प्ले-ऑफ’ लढत आणि अंतिम लढतीचा समावेश होता. मात्र, प्रत्यक्षात ‘प्ले-ऑफ’मध्ये बंगळूरुला एकाही सामन्याच्या आयोजनाची संधी मिळणार नाही.

* ‘‘वेंकटेश प्रसाद सातत्याने ‘बीसीसीआय’च्या संपर्कात होते. ‘प्ले-ऑफ’ सामन्यांच्या आयोजनासाठी ‘केएससीए’ची तयारी आणि उत्सुकता याबाबत त्यांनी ‘बीसीसीआय’ला अधिकृतपणे माहिती दिली होती. असे असूनही ‘प्ले-ऑफ’ सामन्यांच्या आयोजनाची संधी अन्य केंद्रांना दिली गेल्याने आम्ही निराश आहोत,’’ असे ‘केएससीए’चे प्रवक्ते विनय मृत्युंजय म्हणाले.

तिकिटांवरून मतभेद?

कर्नाटक सरकारने राज्यातील आमदार, खासदार आणि विधान परिषद सदस्यांना प्रत्येकी तीन मोफत तिकिटांचा कोटा देण्याच्या निर्णयाला ‘बीसीसीआय’ने विरोध दर्शवला असल्याचे समजते. चिन्नास्वामी स्टेडियमची आसनक्षमता ३५ हजार इतकी आहे. त्यातच गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयी मिरवणुकीदरम्यान स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथील सुरक्षेबाबतही काही प्रश्न कायम आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला गेल्या पाच वर्षांत तब्बल सहा अंतिम लढतींच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. यात ‘आयपीएल’च्या चार अंतिम लढती (२०२२, २०२३, २०२५, २०२६), तसेच २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि २०२६ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचा समावेश आहे.