गुवाहाटी : गेल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर इंंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लढतीत आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे.

हार्दिक अस्वस्थ असल्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले होते. या लढतीत दिल्लीने मुंबईला नमविले होते. संघाला या लढतीत हार्दिकच्या अष्टपैलू खेळाची कमतरता जाणवली.

हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे संघात बदल करण्यात आले. त्याच्या जागी सहभागी झालेल्या दीपक चाहरने चांगली गोलंदाजी केली. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉशला सहभागी करण्याचा संघाचा निर्णय फसला. बॉशने अधिक धावा दिल्या. सध्या हार्दिकने सराव केला असून त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता वाढल्या आहेत. मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी असून राजस्थान चांगल्या कामगिरीसह दुसर्‍या स्थानावर आहे.

दुसरीकडे, राजस्थान संघाला यशस्वी जैस्वाल व युवा वैभव सूर्यवंशी यांनी चांगली सुरुवात दिली होती. यानंतर ध्रुव जुरेलनेही लय कायम राखली आहे. कर्णधार रियान परागला फलंदाजीत फारसे यश मिळाले नसले, तरीही आपल्या नेतृत्वगुणाने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

त्याच्या निर्णयांमुळे राजस्थानने गुजरात टायटन्सविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. गोलंदाजीत तुषार देशपांडे आणि रवि बिश्नोई यांनी चमकदार कामगिरी केली. बिश्नोईने दोन सामन्यांत पाच बळी मिळवले आहेत. तर, तुषारने गुजरातविरुद्ध अखेरच्या षटकात संयमाने गोलंदाजी करीत आपली क्षमता सिद्ध केली.

मुंबईच्या गोलंदाजांकडे नजर

मुंबईसाठी पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा शार्दूल ठाकूर गेल्या सामन्यात महागडा ठरला. तर नेहमीच चमक दाखवणारा जसप्रीत बुमराने कमी धावा दिल्या. मात्र त्याला गडी बाद करता आला नाही. अफगाणिस्तानचा अल्ला गजनफारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मिचेल सँटनरने आपला निर्णय सार्थकी ठरविताना चांगली कामगिरी केली.

राजस्थानविरुद्ध त्याचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या शीर्ष क्रमासमोर मुंबईच्या गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागेल. राजस्थानच्या शीर्ष क्रमातील फलंदाजांनी आतापर्यंत संघासाठी योगदान दिले आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत आक्रमक खेळ केला असून मुंबईच्या गोलंदाजांपुढे त्यांना रोखण्याचे आव्हान असेल.

राजस्थानच्या मध्यक्रमाकडून अपेक्षा

राजस्थानच्या शीर्ष फळीतील फलंदाज चमक दाखवत असले, तरीही मध्य क्रमाचे म्हणावे तसे योगदान मिळालेले नाही. कर्णधार रियान पराग, आक्रमक फलंदाज शिम्रोन हेटमायर व रवींद्र जडेजासारखे खेळाडू फलंदाजीत प्रभाव पाडू शकले नाहीत. शीर्ष फळीच्या कामगिरीमुळे त्यांना कमी संधी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईिवरुद्ध त्यांचा कस लागू शकतो. हेटमायर, पराग दोन्ही खेळाडू मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत. त्यामुळे ते चमक दाखवण्यास उत्सुक असतील. तसेच, जडेजाही आपल्या अष्टपैलू योगदानासाठी सज्ज असेल.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स – १, २, जिओहॉटस्टार ॲप