मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वांत लोकप्रिय संघांमध्ये गणना होणारे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हे संघ आज, रविवारी आमनेसामने येणार आहेत. या दोनही संघांना आपल्या गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे उभय संघांचे विजयी पुनरागमनाचे ध्येय असून ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार्या या सामन्यात यजमान मुंबईसाठी रोहित शर्मा, तर बंगळूरुसाठी विराट कोहली या तारांकित फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरू शकेल.
मुंबईच्या संघाने १३ वर्षांत प्रथमच ‘आयपीएल’च्या नव्या हंगामाची विजयी सुरुवात केली. त्यांनी वानखेडेवरच सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केले होते. मात्र, त्यानंतरच्या दोन सामन्यांत प्रतिस्पध्र्यांच्या मैदानावर खेळताना मुंबईला मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली. प्रथम दिल्ली कॅपिटल्स, मग राजस्थानने मुंबईला मात दिली. याचा मुंबईच्या निव्वळ धावगतीलाही (-०.७१५) मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता घरच्या मैदानावर खेळताना मुंबई संघाला विजय मिळवण्यासह धावगतीवरही लक्ष द्यावे लागेल.
कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
बंगळूरुचा अनुभवी सलामीवीर विराट कोहलीने यंदाच्या हंगामाची सुरुवात अर्धशतकासह केली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन सामन्यांत त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल, शिवाय मुंबईचे गोलंदाजही सध्या संघर्ष करत आहेत. अशात कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. बंगळूरुच्या फलंदाजीची भिस्त कोहलीसह फिल सॉल्ट, कर्णधार रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल आणि टीम डेव्हिड यांच्यावर, तर गोलंदाजीची भिस्त जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्यावर असेल.
रोहित लयीत, मधल्या फळीची चिंता
* ‘आयपीएल’च्या नव्या हंगामात मुंबईसाठी रोहित शर्माने (३ सामन्यांत ११८ धावा) चांगली कामगिरी केली आहे. त्याचा सलामीचा जोडीदार रायन रिकल्टनने पहिल्या सामन्यातील अर्धशतकानंतर पुढील दोन सामन्यांत निराशा केली. त्याने पुन्हा कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.
* मुंबईसाठी मधल्या फळीची कामगिरी चिंतेचा विषय ठरते आहे. विशेषत: तिलक वर्माला (३ सामन्यांत ३४ धावा) अद्याप छाप पाडता आलेली नाही. सूर्यकुमार यादवने एक अर्धशतक केले असले, तरी तो पूर्णपणे लयीत नाही. कर्णधार हार्दिक पंड्यानेही योगदान देणे महत्त्वाचे आहे.
* गोलंदाजीत जसप्रीत बुमरा धावगतीवर नियंत्रण राखण्यात यशस्वी ठरत असला, तरी त्याला अद्याप एकही बळी मिळवता आलेला नाही. प्रतिस्पर्धी संघ बुमराविरुद्ध सावधपणे खेळून मुंबईच्या अन्य गोलंदाजांना लक्ष्य करत आहेत. अशात ट्रेंट बोल्ट, शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंनी कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
