Vaibhav Suryavanshi IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये आपल्या फटकेबाजीने क्रिकेट विश्वाला चकित करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची सध्या जगभर चर्चा आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने केलेल्या वादळी खेळीनंतर अनेक दिग्गजांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली. मात्र, पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने वैभवची तुलना थेट पाकिस्तानच्याच एका वादग्रस्त माजी खेळाडूशी केली आहे. युसूफच्या या तुलनेमुळे सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच भडकले असून, नेटकऱ्यांनी याला ‘वैभवचा मोठा अपमान’ म्हटले आहे.

मोहम्मद युसूफने नक्की काय म्हटले?

आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूत ९७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्याचे आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. वैभवच्या या स्फोटक खेळीनंतर मोहम्मद युसूफने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली.

युसूफने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “१५ वर्षांचा नवोदित स्टार वैभव सूर्यवंशी मला शाहिद आफ्रिदीची आठवण करून देतो. तरुण, निर्भय, स्फोटक आणि ऊर्जेने भरलेला! क्रिकेटचे भविष्य आपल्यासमोर आहे.”

…म्हणून नेटकऱ्यांनी पाकिस्तानातूनच सुनावले खडेबोल

शाहिद आफ्रिदीने १९९६ मध्ये आपल्या पहिल्याच एकदिवसीय (ODI) डावात अवघ्या ३७ चेंडूत शतक ठोकले होते. हे शतक पुढील १८ वर्षे जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठरले होते. आफ्रिदीनेही वयाच्या सुरुवातीच्या काळातच अशी आक्रमक सुरुवात केली होती, हा संदर्भ देत युसूफने ही तुलना केली.

मात्र, भारतीय क्रिकेट चाहत्यांना वैभवची तुलना आफ्रिदीशी झालेली अजिबात आवडलेली नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी युसूफला चांगलेच सुनावले आहे.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया: “वैभवकडे अफाट टॅलेंट आणि सातत्य आहे, त्याची तुलना आफ्रिदीसारख्या बेभरवशाच्या खेळाडूशी करणे हा त्याचा सर्वात मोठा अपमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली, तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, “वैभवला आफ्रिदी नाही, तर आधुनिक क्रिकेटचा किंग बनायचे आहे. त्याची तुलना सचिन किंवा ब्रॅडमनशी होणे योग्य आहे, आफ्रिदीशी नाही.”

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये रचला इतिहास

बिहारच्या अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने चालू आयपीएल हंगामात जगातील दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली आहे. एलिमिनेटर सारख्या अत्यंत दबावाच्या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पाडला, त्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला तो भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जात आहे. मात्र, पाकिस्तानी दिग्गजाने कौतुक करताना केलेल्या या एका चुकीच्या तुलनेमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे.