विश्वचषकात झंझावाती फॉर्ममध्ये असलेल्या ब्रेंडन मॅक्क्युलमच्या बॅटचा तडाखा सनरायझर्स हैदराबाद संघाला बसला. यंदाच्या हंगामातील पहिलेवहिले शतक झळकावताना मॅक्क्युलमने चेन्नई सुपर किंग्सला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या आणि चेन्नईने ४५ धावांनी विजय मिळवला.
 महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  मॅक्क्युलमने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ जोडीने ८ षटकांतच ७५ धावांची खणखणीत सलामी दिली. चोरटी धाव घेण्याचा नादात स्मिथ धावबाद झाला.  सुरेश रैना या सामन्यातही मोठी खेळू शकला नाही. महेंद्रसिंग धोनी-मॅक्क्युलम जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ६३ धावांची वेगवान भागीदारी केली.  डावाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत मॅक्क्युलमने आपले शतक पूर्ण केले.  या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सला ६ बाद १६४ धावांवर समाधान मानावे लागले.
संक्षिप्त धावफलक :
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ३ बाद २०९ (ब्रेंडन मॅक्क्युलम नाबाद १००, महेंद्रसिंग धोनी ५३, ट्रेंट बोल्ट १/३४) विजयी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद  : २० षटकांत ६ बाद १६४ (डेव्हिड वॉर्नर ५३, केन विल्यमसन २६, शिखर धवन २६, ड्वेन ब्राव्हो २/२५). सामनावीर : ब्रेंडन मॅक्क्युलम