मुंबई : इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (आरसीबी) आणि राजस्थान रॉयल्स या जोन फ्रँचायझींची मालकी नवीन व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाकडे गेली. साधारण १८ वर्षांपूर्वी आयपीएल सुरू झाली त्या काळात फ्रँचायझींचे मूल्यांकन कोटी डॉलरमध्ये व्हायचे. आज ते मूल्यांकन अब्ज डॉलरपलीकडे गेले हे या लीगच्या व्यावसायिक यशाचे निदर्शक नक्कीच मानता येईल. आयपीएल आता श्रीमंतीच्या कसोटीवर अमेरिका आणि युरोपातील क्रीडा लीगशी स्पर्धा करू लागल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.
नवे मालक, नवे मूल्य
आरसीबीची मालकी सुरुवातीस विजय मल्याच्या युनायटेड ब्रुव्हरीजकडे आणि नंतर युनायटेड स्पिरिट्सकडे होती. आता या फ्रँचायझीवर आदित्य बिर्ला समूह, टाइम्स ऑफ इंडिया समूह, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन बीएक्सपीई या कंपन्यांची संयुक्त मालकी असेल. आरसीबीवर १०० टक्के नियंत्रणासाठी या संयुक्त समूहाने (कन्सोर्टियम) तब्बल १.७८ अब्ज डॉलर (साधारण १६७०६ कोटी रुपये) इतकी घसघशीत रक्कम मोजली. गतवर्षी आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल अजिंक्यपद पटकावले, तर यंदा डब्ल्यूपीएलमध्ये आरसीबीचा महिला संघ अजिंक्य ठरला. दोन्ही संघ अशा प्रकारे विद्यमान विजेते असल्यामुळे त्यांचे ब्रँड मूल्य वाढणे स्वाभाविक होते. परंतु राजस्थान रॉयल्ससाठीही अब्जापार किंमत मोजली जाणे हे एकंदरीत आयपीएलचे ब्रँड वजन वाढल्याचेच दर्शवते. काल सोमाणी आणि त्यांच्या संयुक्त समूहाने या फ्रँचायझीवर पूर्ण नियंत्रण स्थापित करण्यासाठी १.६३ अब्ज डॉलर (साधारण १५३०० कोटी रुपये) मोजले.
काल सोमाणी यापूर्वीही राजस्थान रॉयल्समध्ये एक भागभांडवलधारक होते. सन २००८मध्ये आरसीबीचा ताबा विजय मल्याने घेतला त्यावेळी या फ्रँचायझीचे मूल्यांकन ११.१ कोटी डॉलर (१०४० कोटी रुपये सध्याच्या विनिमय दरानुसार) इतके झाले होते. म्हणजे इतक्या काळात आरसीबीच्या मूल्यामध्ये १४९५ टक्के इतकी प्रचंड वाढ झालेली दिसून येते. आयपीएलच्या पहिल्या पर्वात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली अनपेक्षित अजिंक्यपद पटकवलेल्या राजस्थान रॉयल्सच्या मूल्यातही वाढ झाली. त्यावेळी ६.७ कोटी डॉलर (६२८ कोटी रुपये सध्याच्या विनिमय दरानुसार) मोजले गेले. म्हणजे राजस्थानच्या मूल्यामध्ये २३३६ टक्के इतकी घसघशीत वाढ नोंदवली गेली. राजस्थान रॉयल्स दरम्यानच्या काळात अनेक वादांमध्ये अडकले होते.
आरसीबी तर गेली कित्येक वर्षे आयपीएल जिंकू शकले नव्हते. म्हणजे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाइटरायडर्स यांच्या तुलनेत या दोन्ही फ्रँचायझी संघांचे स्थान खालचेच राहिले. तरीदेखील त्यांच्यासाठी केवळ देशांतर्गत व्यक्ती आणि उद्योगसमूहच नव्हे तर परदेशस्थ भारतीय आणि परदेशी समूहदेखील गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. काल सोमाणी हे अमेरिकेतील टेक्नॉलॉजी विश्वात सुपरिचित आहेत. त्यांच्या मालकीच्या काही कंपन्यादेखील आहेत. सोमाणी यांच्या बरोबरीने वॉलमार्ट कंपनीचे रॉब वॉल्टन आणि जगप्रसिद्ध फोर्ड मोटर कंपनीशी संबंधित शीला फोर्ड हॅम्प या अमेरिकन मंडळींनीही रॉयल्समध्ये गुंतवणूक केली. नवीन मालक २०२६ हंगामानंतरच आपापल्या फ्रँचायझींचा ताबा घेतील.
वादग्रस्त तरीही यशस्वी
आयपीएल आणि वाद हे नाते तसे जुनेच. आयपीएलचे प्रणेते ललित मोदी यांच्यावर अनेक आर्थिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप असल्यामुळे ते भारतात अटक टाळण्यासाठी ब्रिटनमध्ये राहात आहेत. मालकी आणि नियंत्रण पॅटर्नमध्ये अनियमितता आढळल्यामुळे राजस्थान रॉयल्सविषयी नेहमीच संशय व्यक्त व्हायचा. स्पॉट फिक्सिंग वादात दोषी आढळल्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या फ्रँचायझींवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तर कोची फ्रँचायझी तर आता नामशेषच झाली. डेक्कन चार्जर्सच्या मालकांना हैदराबाद फ्रँचायझी झेपेनाशी झाल्यामुळे तिचा ताबा सन समूहाकडे गेला. असे असले तरी या लीगवर देशातील आणि देशाबाहेरील क्रिकेटप्रेमींचे प्रेम जराही कमी झालेले नाही. उलटते वाढतच गेले. या क्रिकेटप्रेमींची संख्या कित्येक कोटींमध्ये भरते. गतवर्षी आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामना १६.९ कोटी टीव्ही आणि डिजिटल प्रेक्षकांनी पाहिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२१मध्ये झालेल्या टी-२० सामन्याला लाभलेल्या १६.६ कोटी प्रेक्षकांपेक्षा ही संख्या अधिक भरली. आयपीएलच्या त्या हंगामाला एकूण १ अब्जपेक्षा अधिक प्रेक्षक टीव्ही आणि डिजिटल माध्यमांतून मिळाले. आयपीएलच्या बाबतीत आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे, या स्पर्धेतून मिळणारे उत्पन्न सर्व फ्रँचायझींमध्ये समान वाटण्याचे बीसीसीआयचे धोरण. यामुळे गुंतवणूक आणि त्यावरील परतावा हे गणित फार विस्कटत नाही. त्यामुळेच बड्या प्रस्थापित उद्योगसमूहांप्रमाणेच छोट्या कंपन्या आणि व्यक्तीही गुंतवणूक करण्यास कचरत नाहीत.
ईपीएल विरुद्ध आयपीएल
आयपीएलमध्ये गुंतवुकीस जागतिक गुंतवणूकदार आणि कंपन्याही उत्सुक आहेत ही बाब ताज्या खरेदी व्यवहारांनी अधोरेखित झाली. आयपीएलची तुलना गेली काही वर्षे इंग्लंडमधील इंग्लिश प्रिमियर लीग, अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि नॅशनल फुटबॉल लीग या आघाडीच्या क्रीडा लीगशी केली जाते. याचे कारण भारतात क्रिकेटची लोकप्रियता इतकेच नाही. भारताकडे क्रिकेटमधील एक अत्यंत यशस्वी देश म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे. भारतामध्ये स्थानिक क्रिकेटपटूंचा संचय आणि संस्कृती अतिशय भक्कम आहे. पायाभूत सुविधा, प्रशिक्षण सुविधा उत्तम आहेत. तसेच. टी-२० वा एकदिवसीय क्रिकेट, युवा आणि महिला क्रिकेट अशा विविध स्तरांवर भारत जागतिक अजिंक्यपदे पटकावतानाही दिसतो. यातून क्रिकेटची लोकप्रियता वृद्धिंगत होते. यातून टीव्ही आणि डिजिटल व्यासपीठांना वाढीव ‘आयबॉल्स’ मिळणे, त्यातून अधिकाधिक जाहिरातदार पुढे येणे आणि या सगळ्यातून पुन्हा एकदा उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण होणे हेही सातत्याने दिसून येत आहे. एनबीए किंवा एनएफएलमध्ये परदेशी खेळाडू फार नसतात. पण ईपीएलप्रमाणेच आयपीएलमध्येही परदेशी खेळाडूंचा भरणा मोठा आहे. इतर कोणत्याही देशातील लीगपेक्षा – ऑस्ट्रेलियातील बीबीएल असो वा इंग्लंडमधील हंड्रेड – आयपीएलमध्ये अधिक संख्येने परदेशी क्रिकेटपटू सहभागी होतात. यातून आयपीएलच्या जागतिक स्वीकारार्हतेत वाढ होते. पाकिस्तानी खेळाडूंना गेली कित्येक वर्षे प्रवेश मिळालेला नाही ही बाब सर्रास दुर्लक्षित होते. कारण भारतीय क्रिकेटप्रेमींची संख्या, जगभरातील त्यांची व्याप्ती आणि जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न राजकीय वादातही नजरेआड करता येत नाही हे वास्तव आहे.
siddharth.khandekar@expressindia.com
