सलामीवीर गौतम गंभीर याने आयपीएलच्या मध्यातच दिल्ली संघाचे कर्णधारपद सोडले. गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या ६ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकला होता. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्याने त्यानंतर दिल्लीच्या संघाकडून एकही सामना खेळला नाही.

याबाबत बोलताना गौतम गंभीरने एक गौप्यस्फोट केला आहे. ‘ कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा माझा स्वतःचा होता. मात्र संघातून स्वतःला वगळण्याबाबत मी कधीही बोललो नव्हतो. मला संघातून वगळणे हा जर संघ व्यवस्थापनाच्या प्लॅनचा भाग असेल, तर ठीक आहे. परंतु मी स्वतःच मला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे’, असे गंभीर म्हणाला. मी प्रत्येक सामना खेळण्यासाठी तयार होतो, असेही त्याने मुलाखतीत स्पष्ट केले.

गंभीरने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर श्रेयस अय्यर याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. गंभीरबद्दल बोलताना तो म्हणाला की गंभीरच्या त्या निर्णयाबाबत मी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्याला संघातून वगळण्याचा निर्णय माझा नव्हता. गंभीरने स्वतः संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय धाडसी होता. त्याच्या या निणर्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर अधिक वाढला. गंभीर संघाबाहेर बसल्याने सलामीवीर कॉलिन मुनरोला संधी मिळाली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला, असे श्रेयसने सांगितले होते. त्याबाबत बोलताना गंभीरने गौप्यस्फोट केला.

मी स्वतःहून संघाबाहेर बसलो नव्हतो. तसे करायचे असते तर मी सरळ निवृत्तीचा निर्णय घेतला असता. पण तसे नाही. कारण मी अजून खूप काळ क्रिकेट खेळू शकतो असा मला विश्वास आहे, असेही गंभीरने स्पष्ट केले.