आयपीएलच्या हंगामात आता केवळ एक सामना शिल्लक आहे. हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ही झुंज होणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. मात्र या आयपीएलमध्ये असे काही घडले की दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी हे दोघेही भडकले.

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण ८ संघांपैकी ४ संघाचे प्रशिक्षक हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. हैदराबादचे टॉम मुडी, दिल्लीचे रिकी पाँटिंग, पंजाबचे ब्रॅड हॉज आणि राजस्थानचे (मेंटॉर) शेन वॉर्न हे चार प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे आहेत. यातील टॉम मुडी वगळता इतर तीन प्रशिक्षकांनी संघातील ‘अंतिम ११’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना झुकते माप दिले. इतकेच नव्हे, तर चांगली कामगिरी करत नसतानाही काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना वारंवार संधी देण्यात आली, असा आरोप एका कार्यक्रमात बोलताना ग्रॅम स्मिथ याने केला होता. ग्रॅम स्मिथ हा आयपीएलमध्ये समालोचक, सूत्रसंचालक आणि क्रिकेट तज्ज्ञ म्हणून काम पाहत आहे. त्याने हा आरोप केला होता.

याबाबत डॅरेन सॅमीने ट्विट केले. त्याने त्याच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक आयपीएलमध्ये त्यांच्या देशाच्या खेळाडूंना झुकते माप देतात, या स्मिथच्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. या बरोबरच त्याने ‘शॉट्स फायर्ड’ हा हॅशटॅग वापरत टीकास्त्र सोडण्यात आले आहे, असाही इशाराही दिला.

सातत्याने खराब कामगिरी करूनही दिल्लीच्या संघात ग्लेन मॅक्सवेलला, राजस्थानच्या संघात डार्सी शॉर्टला तर पंजाबच्या संघात अॅरॉन फिंचला स्थान देण्यात आले. फिंचच्या जागी डेव्हिड मिलरना का खेळवले जात नाही? असा प्रश्नही चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आला होता.