बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामन्यात, विराट कोहलीच्या संघाने विजय मिळवत प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान अजुनही कायम राखलेलं आहे. मात्र बंगळुरुच्या विजयात सगळ्यात जास्त चर्चेची गोष्ट ठरली ती म्हणजे एबी डिव्हीलियर्सने सीमारेषेवर पकडलेला झेल. मोईन अलीच्या गोलंदाजीवर डिव्हीलियर्सने अॅलेक्स हेल्सने मारलेला उंच फटका, सुपरमॅनलाही लाजवेल असा टिपला. डिव्हीलियर्सच्या या कॅचची संपूर्ण दिवस सोशल मीडियावर चर्चा सुरु होती.

याच सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजीदरम्यान, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने अशाच प्रकारे झेल पकडत आपलं क्षेत्ररक्षणातलं कौशल्या दाखवून दिलं. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर बंगळुरुच्या कॉलिन डी ग्रँडहोमने खणखणीत फटका खेळला, हा फटका सीमारेषेपार जाणार असं वाटत असतानाच राशिद खानने उडी घेत एका हातात झेल पकडत डी ग्रँडहोमला माघारी धाडलं.

राशिद खानने गोलंदाजीदरम्यान ४ षटकांमध्ये २७ धावा देत ३ बळी घेतले. मात्र त्याची ही कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. मात्र या दोन्ही खेळाडूंनी घेतलेल्या कॅचची दिवसभर सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंपैकी कोणाचा कॅच तुम्हाला सर्वात जास्त आवडला?