इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामातील अखेरच्या टप्प्यातील आजच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्ससमोर राजस्थान रॉयल्सची सत्त्वपरीक्षा होणार आहे. साखळी सामन्यांमध्ये दोनवेळा पराभूत झालेल्या राजस्थान संघाला त्या दोन्ही पराभवांचे उट्टे काढून पुढे सरकण्याची संधी या सामन्यात मिळणार आहे, तर कोलकातापुढे त्यांचे विजयी अभियान कायम राखत अंतिम तिघात पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे.

यंदाच्या हंगामात कोलकाता संघाने घरच्या मैदानासह जयपूरमध्येदेखील राजस्थान संघाला पराभूत केले होते. विशेष म्हणजे एका सामन्यात सात विकेट राखून तर दुसऱ्या सामन्यात सहा विकेट राखून सहज विजय मिळवले होते. कोलकाताने एकूण सहाव्यांदा अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. अत्यंत नियोजनबद्धपणे कोलकाताने ही त्यांची वाटचाल केली असून दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली हा संघ आता पूर्ण बहरात दिसत असल्याने त्यांना या सामन्यातही चांगली संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या पर्वातील विजेता असलेल्या राजस्थान संघातील त्यांचे दोन प्रमुख खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यापोटी बाहेर पडले आहेत. इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स या दोघांविना मैदानात उतरावे लागणार असल्याने राजस्थान संघाला हा सामना जिंकण्यासाठी सर्वच आघाडय़ांवर सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.  एकप्रकारे उपांत्यपूर्व मानल्या जाणाऱ्या या सामन्यात जिंकणे अत्यावश्यक असून पराभव झाल्यास थेट बाहेर पडावे लागणार आहे. फलंदाजीत कर्णधार अजिंक्य रहाणेने भक्कमपणे उभे राहण्यासह संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांनी मोठी धावसंख्या उभारत फलंदाजीत चमक दाखवणे आवश्यक आहे. तसेच कोलकाताच्या सुनील नरेन, पीयूष चावला आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा यशस्वी मुकाबला त्यांना करावा लागणार आहे. गोलंदाजीच्या आघाडीवरही खूप चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्याउलट कोलकाता संघाची स्थिती अधिक भक्कम दिसत आहे. कर्णधार दिनेश कार्तिक स्वत: दमदार फलंदाजी करीत असून संघातील अन्य फलंदाजांनाही प्रेरणा देत आहे. ४३८ धावा करून संघातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. फलंदाजीत ख्रिस लीनसमवेत नरेनच्या सलामीचा डाव यशस्वी ठरला असून मधल्या फळीतील फलंदाजही चांगली कामगिरी करीत आहेत. फिरकी गोलंदाज तर पूर्ण बहरात असून जलदगती गोलंदाजांपैकी प्रसिध कृष्णाने हैदराबादविरुद्ध कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवत ३० धावा देत ४ विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे कोलकाता संघाचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.

आजचा सामना

  • वेळ : सायंकाळी ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स