आयपीएलच्या अकराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाने धडाकेबाज कामगिरी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. आयपीएल सुरु होण्याआधी कर्णधाड डेव्हिड वॉर्नरला बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे हैदराबादची सुत्र गेली. वॉर्नरच्या अनुपस्थितीत विल्यमसननेही सर्वोत्तम कामगिरी करत सर्वोत्तम ४ संघांमध्ये हैदराबादचं स्थान कायम ठेवलं आहे. विल्यमसनच्या या कामगिरीवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर सध्या भलतेच खूश आहेत. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये गावसकर यांनी विल्यमसनची तुलना महेंद्रसिंह धोनीशी केली आहे.

“या हंगामात विल्यमसनबद्दल मला भावलेली गोष्ट म्हणजे तो कठीण परिस्थितीमध्येही तितकाच शांत राहतो. धोनीप्रमाणे शांत डोक्याने खेळ करत तो आपल्या संघाची मोट कायम बांधून ठेवतो”, असं म्हणत गावसकर यांनी विल्यमसनचं कौतुक केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत विल्यमसन हा हैदराबादच्या संघाला एकत्र बांधून ठेवणारा दुवा आहे. मागच्या हंगामात विल्यमसनच्या वाट्याला फारशे सामने आले नाहीत, मात्र यंदा अनपेक्षितरित्या आलेलं कर्णधारपद आणि त्यात चांगली कामगिरी करण्याचं आव्हान या दोन्ही निकषांमध्ये विल्यमसन उजवा ठरला असल्याचंही गावसकर म्हणाले.

अवश्य वाचा – बंगळूरुला हैदराबादवर विजय अनिवार्य

बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर दोषी ठरल्यानंतर केन विल्यमसनकडे हैदराबादच्या संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. अकराव्या हंगामाच्या लिलावात विल्यमसनवर ३ कोटींची बोली लावण्यात आली होती. सध्या विल्यमसन आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.