सनरायझर्स हैदराबाद-कोलकाता नाइट रायडर्स आज झुंजणार

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) बाद फेरीचा अडथळा पार करून दोन वेळचा विजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ दिमाखात ‘क्वालिफायर टू’मध्ये येऊन पोहचला आहे.  शुक्रवारी त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

२०१६च्या विजेत्या हैदराबादला पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चुरशीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. बाद फेरीतील स्थान निश्चित केल्यानंतर त्यापुढील सलग चार सामन्यांत पराभूत झाल्यामुळे हैदराबादचा आत्मविश्वास नक्कीच कमी झाला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा आपल्या अव्वल खेळासाठी त्यांना सज्ज व्हावे लागणार आहे. शिखर धवन  व कर्णधार केन विल्यम्सन या दोघांवर हैदराबादची मदार असून यांच्यामधून एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला तर खोऱ्याने धावा काढू शकतो. मनीष पांडे फॉर्मात आल्यामुळे हैदराबादला दिलासा मिळाला आहे. तरीही, शकिब अल हसन आणि युसुफ पठाण यांना  खेळ उंचावण्याची गरज आहे. गोलंदाजीच्या बळावर हैदराबादने चेन्नईलासुद्धा पराभवाच्या छायेत ढकलले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात गोलंदाजांवरच त्यांची प्रामुख्याने भिस्त असणार आहे.

दुसरीकडे २०१२ व २०१४ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाताने स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या शर्यतीतील सामन्यात राजस्थान रॉयल्सला धूळ चारून उपांत्य फेरी गाठली. ऐन मोक्याच्या वेळी कर्णधार दिनेश कार्तिकचा संघ सर्वच पातळींवर उल्लेखनीय प्रदर्शन करत असून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना त्यांचे मनोबल आणखी उंचावलेले असेल. सलामीवीर सुनील नरिन व ख्रिस लिन, नितीश राणा, शुभमन गिल आणि धडाकेबाज आंद्रे रसेल अशी तुफानी फलंदाजी कोलकात्याच्या ताफ्यात आहे. फिरकीपटू कोलकात्याच्या विजयात खारीचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे कुलदीप यादव, पीयुष चावला आणि नरिन यांच्यावर कोलकाता अवलंबून आहे. प्रसिध कृष्णानेही मागील काही सामन्यांत केलेल्या सुरेख गोलंदाजीमुळे कोलकाताचा संघ समतोल वाटत आहे.

सनरायझर्स हैदराबाद

बलस्थाने

  • हैदराबादची प्रमुख भिस्त कर्णधार केन विल्यम्सनवर आहे. ६८५ धावांसह तो सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.
  • शिखर धवनचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. त्याने १४ सामन्यांत ४३७ धावा बनवल्या आहेत.
  • वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल आणि फिरकीपटू रशिद खान यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करताना १५ सामन्यांमध्ये अनुक्रमे १९ व १८ बळी मिळवले आहेत.

कच्चे दुवे

  • सलग चार सामन्यातील पराभवामुळे आत्मविश्वासाची कमतरता.
  • विल्यम्सनवर अति अवलंबून राहणे संघाला धोकादायक ठरू शकते.

कोलकाता नाइट रायडर्स

बलस्थाने

  • कर्णधार दिनेश कार्तिक तुफान फॉर्मात आहे. कोलकातासाठी त्याने सर्वाधिक १५ सामन्यांत ४९० धावा केल्या आहेत.
  • अष्टपैलू आंद्रे रसेलचे योगदान आणि घरच्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता.
  • फिरकीपटू खोऱ्याने बळी मिळवत आहेत. सुनील नरिन (१६ बळी), कुलदीप यादव (१५) आणि पीयूष चावला (१३).

कच्चे दुवे

  • सलामीवीरांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव.
  • नितीश राणा गेल्या काही सामन्यांत सपशेल अपयशी.
  • फिरकीपटू सोडले तर गोलंदाजीत अनुभवी वेगवान गोलंदाजाची उणीव.

वेळ : सायंकाळी ७ वा.

प्रक्षेपण :स्टार स्पोर्ट्स.