श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्स संघावर मात करत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना दिल्लीच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. २०१९ पर्यंत दिल्लीच्या संघाचा सदस्य असलेल्या ट्रेंट बोल्टला यंदाच्या हंगामात प्लेअर ट्रान्स्फर विंडो अंतर्गत मुंबईच्या संघात जागा मिळाली. बोल्टसारख्या मॅचविनर गोलंदाजाला दिल्लीने मुंबईकडे कसं दिलं याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. SRH चे माजी प्रशिक्षक टॉम मुडी यांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज राशिद खानला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती मुडी यांनी दिली.

अवश्य वाचा – …तर मुंबई इंडियन्सचा संघ टी-२० विश्वचषकही जिंकेल !

“मला साधारण दोन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो आहे, ज्यावेळी मुंबई इंडियन्सने हैदराबाद संघाकडे राशिद खानची मागणी केली होती. राशिद खानसारख्या खेळाडूची मागणी करण्याची हिंमत फक्त मुंबई इंडियन्ससारखा संघच करु शकतो. हैदराबादने राशिद खानला मुंबईकडे दिलं नाही हा भाग वेगळा…पण आमचा संघ इतक्या आत्मविश्वासाने एखाद्या खेळाडूची मागणी करु शकला नसता.” ESPNCricinfo च्या कार्यक्रमात बोलत असताना मुडी यांनी माहिती दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : मी छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागत नाही – रोहित शर्मा

हैदराबादच्या संघाचे माजी प्रशिक्षक असलेल्या मुडी यांना यंदाच्या हंगामासाठी संघाने संधी दिली नाही. इंग्लंडचे माजी प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी हैदराबादच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. डेव्हीड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद संघाने यंदा आश्वासक खेळ करत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. परंतू उपांत्य फेरीत दिल्लीसमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही.

अवश्य वाचा – Video : रोहितसाठी सूर्यकुमारने स्वत:च्या विकेटवर सोडलं पाणी, नेटकरीही झाले फिदा