scorecardresearch

IPL 2020 : हैदराबादची हाराकिरी ! हातातला सामना RCB ला केला बहाल

चहलचे एकाच षटकांत दोन बळी आणि सामना RCB च्या बाजूने फिरला

बेअरस्टो बाद झाला आणि सामन्याचं चित्रच पालटलं… फोटो सौजन्य – Saikat Das / Sportzpics for BCCI
मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हैदराबादला हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी हैदराबादच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात दमदार पुनरागमन केलं. एका क्षणाला हातातून गमावलेला सामना बंगळुरुने १० धावांनी जिंकला. युजवेंद्र चहलने एकाच षटकात जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत बंगळुरुच्या विजयाची पायाभरणी केली. हैदराबादकडून बेअस्टोने धडाकेबाज अर्धशतक झळकावलं, पण त्याची खेळी व्यर्थ गेली.

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली. पांडे-बेअरस्टो जोडी मैदानात चमत्कार घडवणार असं वाटत असतानाच पांडे माघारी परतला. यानंतरही बेअरस्टोने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरु ठेवली. बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने ४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६१ धावा केल्या. युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत हैदराबादला धक्का दिला.

यानंतर हैदराबादच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर फारसा स्थिरावू शकला नाही. अनेक फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकल्यामुळे बंगळुरुच्या संघाला विजय सोपा झाला. युजवेंद्र चहलने ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला नवदीप सैनी आणि शिवम दुबे यांनी २-२ तर स्टेनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात १६३ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय काहीसा फसला. पदार्पणाचा आयपीएल सामना खेळणाऱ्या देवदत पडीकलने फिंचच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पडीकलने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली. परंतू सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर RCB च्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पडीकल आणि डिव्हीलियर्स यांनी सामन्यात अर्धशतकं झळकावली.

पडीकल हा RCB च्या पहिल्या डावातला हिरो ठरला. स्थानिक स्पर्धांमधील अनुभवाच्या जोरावर पडीकलने आश्वासक फलंदाजी केली. ४२ चेंडूत ८ चौकारांनिशी त्याने ५६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने फिंचनेही त्याला चांगली साथ दिली. विजय शंकरने पडीकलला आणि अभिषेक शर्माने फिंचला माघारी धाडत RCB ची जोडी फोडली. यानंतर मधल्या षटकांमध्ये बंगळुरुची धावगती पुन्हा एकदा मंदावली. विराट-एबी डिव्हीलियर्स यांसारखे अनुभवी फलंदाज असतानाही हव्या त्या गतीने धावा झाल्या नाहीत. विराट कोहलीही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नटराजनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर राशिद खानकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने १४ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने डिव्हीलियर्सने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. डिव्हीलियर्सने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत फटकेबाजी करुन आपलं अर्धशतक साजरं केलं. त्याने ५१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना तो धावबाद झाला. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

23:35 (IST)21 Sep 2020
राशिद खान, मिचेल मार्श, संदीप शर्मा ठराविक अंतराने माघारी

हैदराबादने हातातला सामना गमावला, RCB १० धावांनी विजयी

23:17 (IST)21 Sep 2020
हैदराबादला सातवा धक्का, भुवनेश्वर माघारी

नवदीप सैनीने घेतला बळी

यानंतर राशिद खानलाही धाडलं माघारी

23:06 (IST)21 Sep 2020
हैदराबादची हाराकिरी सुरुच…दुहेरी धाव घेताना दोन्ही फलंदाजांमध्ये टक्कर

अभिषेक माघारी, हैदराबादला सहावा धक्का

23:04 (IST)21 Sep 2020
प्रियम गर्ग विचीत्र पद्धतीने बाद

शिवम दुबेच्या गोलंदाजीवर हेल्मेटला लागलेला चेंडू आदळला स्टम्पवर, हैदराबादला पाचवा धक्का

23:00 (IST)21 Sep 2020
उमेश यादवच्या गोलंदाजीवर बेअरस्टोचा भन्नाट षटकार

बातमी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा…

22:55 (IST)21 Sep 2020
लागोपाठ विजय शंकर माघारी

चहलचा टप्पा पडून आत येणारा चेंडू शंकरला समजला नाही, चेंडू थेट स्टम्पवर

22:52 (IST)21 Sep 2020
हैदराबादला मोठा धक्का, जॉनी बेअरस्टो त्रिफळाचीत

४३ चेंडूत ६१ धावांची खेळी करुन बेअरस्टो चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत

मोक्याच्या क्षणी हैदराबादचा मह्त्वाचा फलंदाज माघारी, सामन्यात रंगत कायम

22:43 (IST)21 Sep 2020
जॉनी बेअरस्टोचं अर्धशतक

हैदराबादचं आव्हान कायम, RCB च्या क्षेत्ररक्षकांचं गलथान क्षेत्ररक्षण

मिळालेल्या जीवदानांचा फायदा घेत बेअरस्टोचं अर्धशतक

22:32 (IST)21 Sep 2020
हैदराबादची जोडी फोडण्यात RCB ला यश, मनिष पांडे माघारी

मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पांडे ३४ धावा काढून माघारी

चहलने घेतला बळी

22:12 (IST)21 Sep 2020
मनिष पांडे-जॉनी बेअरस्टो जोडीची महत्वपूर्ण भागीदारी

हैदराबादचा डाव सावरला, बेअरस्टोची फटकेबाजी

21:38 (IST)21 Sep 2020
हैदराबादला पहिला धक्का, कर्णधार वॉर्नर धावबाद

उमेश यादवच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने खेळलेला फटका, चेंडू उमेशच्या हाताला लागून स्टम्पवर

धाव घेण्यासाठी पुढे धावलेला वॉर्नर बाद, बंगळुरुला पहिलं यश

21:24 (IST)21 Sep 2020
अखेरच्या षटकात शिवम दुबेही धावबाद

२० षटकांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची १६३ धावांपर्यंत मजल, हैदराबादला विजयासाठी १६४ धावांचं आव्हान

21:11 (IST)21 Sep 2020
RCB ला चौथा धक्का, डिव्हीलियर्स धावबाद

चोरटी धाव घेताना डिव्हीलियर्स बाद, ३० चेंडूत केल्या ५१ धावा

21:10 (IST)21 Sep 2020
एबी डिव्हीलियर्सची फटकेबाजी

अखेरच्या षटकांत चौकार-षटकारांची आतिषबाजी करत झळकावलं अर्धशतक

20:49 (IST)21 Sep 2020
RCB ला तिसरा धक्का, विराट कोहली माघारी

उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात १४ धावांवर विराट बाद

20:38 (IST)21 Sep 2020
पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी…
20:32 (IST)21 Sep 2020
RCB ला लागोपाठ दुसरा धक्का, फिंच माघारी

युवा फिरकीपटू अभिषेक शर्माने फिंचला केलं पायचीत, २९ धावा काढून फिंच बाद

20:31 (IST)21 Sep 2020
विजय शंकरने फोडली RCB ची जोडी, पडीकल माघारी

मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तोल गमावल्यामुळे पडीकल त्रिफळाचीत, ४२ चेंडूत ८ चौकारांनिशी ५६ धावांची खेळी

20:23 (IST)21 Sep 2020
देवदत पडीकलचं पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक

हैदराबादच्या गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार, अभिषेकच्या गोलंदाजीवर चौकार खेचत झळकावलं पहिलं अर्धशतक

20:07 (IST)21 Sep 2020
पडीकलच्या या आकडेवारीवर एकदा नजर टाका
20:01 (IST)21 Sep 2020
RCB ने ओलांडला ५० धावांचा टप्पा

हैदराबादच्या गोलंदाजांचा स्वैर मारा, पडीकल-फिंच जोडीची फटकेबाजी

20:01 (IST)21 Sep 2020
नवा हंगाम, नवी सुरुवात

RCB च्या देवदत्त पडीकल आणि फिंच या जोडीबद्दल ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?? जाणून घ्या…

19:59 (IST)21 Sep 2020
सनराईजर्स हैदराबादला धक्का, मिचेल मार्श गोलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त

पाचवं षटक टाकत असताना मार्शला दुखापत, विजय शंकरने टाकलं उर्वरित षटक

19:58 (IST)21 Sep 2020
पडीकल-फिंच जोडीची RCB कडून आश्वासक सुरुवात

पडीकलची मैदानाच चौफेर फटकेबाजी, फिंचचीही उत्तम साथ

19:28 (IST)21 Sep 2020
देवदत्त आणि जोशुआ फिलिपेला यांचेही पदार्पण

देवदत्त पडिक्कल आणि ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ फिलिपेला आरसीबीने संघात स्थान दिले आहे. दोघांचेही आयपीएलमधे पदार्पण होतं आहे. बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या फिलिपेच्या आगमनाने बेंगळूरु पहिल्यांदाच ‘आयपीएल’ जिंकणार का, हे पाहणे रंजक ठरेल

19:25 (IST)21 Sep 2020
प्रियम गर्गचं आयपीएलमध्ये पदार्पण

भारताचा अंडर-१९ संघाचा कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं अंतिम ११ मध्ये संधी दिली आहे. हैदाराबादकडून प्रियम आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.

19:19 (IST)21 Sep 2020
असा आहे हैदराबादचा अंतिम ११ जणांचा संघ
19:14 (IST)21 Sep 2020
असा आहे RCB चा पहिल्या सामन्यासाठी संघ
19:07 (IST)21 Sep 2020
हैदराबादने नाणेफेक जिंकली

कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मराठीतील सर्व आयपीएल २०२० ( Ipl2020 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2020 rcb vs srh match 3 dubai live updates psd