IPL 2019मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात जोस बटलरला मंकडिंग करत धावचीत केलं होतं. ६९ धावांवर खेळत असलेला जोस बटलर त्यावेळी नॉन स्ट्राईकवर उभा होता. चेंडू टाकण्याआधीच तो धाव घेण्यासाठी पुढे गेला, त्यावेळी अश्विनने संधी साधत त्याला ‘मंकडिंग’ केलं. या मुद्द्यावरून नंतर बराच वादंग निर्माण झाला. आता IPL 2020मध्ये अश्विन दिल्लीच्या संघाकडून खेळणार आहे. पण दिल्लीकडून खेळताना असं काही करण्याची त्याला अजिबात परवानगी नसणार आहे. याचदरम्यान, दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन याने एक भन्नाट उपाय सुचवला आहे.

अश्विनने केलेलं मंकडिंग हे नियमाला धरून असलं तरी ते खिलाडीवृत्तीला साजेसं नाही असा सूर त्यावेळी पाहायला मिळाला होता. त्यावरून मुरलीथरनने एक उपाय सांगितला. “जर गोलंदाजाने फलंदाजांला मंकडिंग पद्धतीने बाद करणं अयोग्य असेल तर फलंदाजालाही चेंडू सुटण्याआधी क्रीजबाहेर जाण्याचा फायदा मिळणं योग्य नाही. मला वाटतं की अशा परिस्थितीत फलंदाजाला ताकीद देण्यात यावी. आणि फलंदाजाला बाद न ठरवता संघाला पाच पेनल्टी धावा (पाच धावा धावसंख्येतून वजा करणं) देण्यात याव्यात”, असा उपाय मुरलीथरनने हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना सुचवला.

अश्विनने केली होती फ्री बॉलची मागणी

“गोलंदाजांसाठीदेखील फ्री बॉलचा नियम लागू करण्याच यायला हवा. जर फलंदाज त्या चेंडूवर बाद झाला तर त्या संघाचे पाच गुण वजा केले जातील असा नियम असायला हवा. फ्री हिट या नियमामुळे फलंदाजांना संधी मिळाली, तशीच गोलंदाजांनाही संधी मिळायला हवी. कारण हल्ली गोलंदाजांची कशी धुलाई केली जाते याच कारणासाठी क्रिकेटचे सामने बघितले जात आहेत”, असे ट्विट करत अश्विननेही एक बदल सुचवला होता.