हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात षटकारांच्या आतषबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शारजाच्या मैदानावर रोहितने पहिल्याच षटकार उत्तुंग षटकार खेचला. दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संदीप शर्माने पहिलं षटकं टाकलं. त्यात चौथ्या चेंडूवर रोहितने धडाकेबाज षटकार लगावला. पण त्याच षटकात पुढच्या चेंडूवर संदीपने टाकलेला चेंडू बाहेरच्या दिशेने इन-स्विंग झाला. रोहितने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झालं नाही. हैदराबादच्या संघाने मात्र लगेच DRSची मागणी केली आणि त्यात रोहितला बाद ठरवण्यात आले. त्यामुळे रोहितला ६ धावांवरच माघारी परतावे लागले.

रोहितनंतर सूर्यकुमार यादवने दमदार फटकेबाजी केली. त्याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. १८ चेंडूत त्याने ६ चौकारांसह २७ धावा कुटल्या. क्विंटन डी कॉकने दमदार अर्धशतक ठोकलं, पण तो ६७(३९) धावांवर बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. त्यानंतर इशान किशननेही दमदार खेळ केला, परंतु तोदेखील २३ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला.