आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. परंतू चेन्नईच्या संघासमोर यंदा अनेक संकंट निर्माण झालेली आहेत. संघातील खेळाडूंना झालेली करोनाची लागण आणि त्यानंतर रैना आणि हरभजन यांनी घेतलेली माघार यामुळे संघात पोकळी निर्माण झाली आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्यामते चेन्नईच्या संघासाठी रैनाची अनुपस्थिती हा कळीचा मुद्दा ठरु शकतो.

“रैना हा आयपीएलमधील टॉप ५ खेळाडूंपैकी एक मानला जातो, त्यामुळे त्याची अनुपस्थिती यंदा संघाला जाणवू शकते. तो डावखुरा फलंदाज आहे आणि फिरकीपटूंविरोधात तो चांगला खेळतो. चेन्नईसाठी सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे त्यांचे बहुतांश फलंदाज हे उजव्या हाताने खेळणारे आहेत.” डीन जोन्स स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर बोलत होते. चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाच्या जागेवर बदली खेळाडूला संधी देणं गरजेचं असल्याचं मतही जोन्स यांनी व्यक्त केलं.

शेन वॉटसन, महेंद्रसिंह धोनी हे गेल्या काही काळापासून फारसं क्रिकेट खेळलेले नाहीत. त्यामुळे स्टिफन फ्लेमिंग आणि धोनी यांच्यासमोर संघबांधणी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. याचसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर धोनी पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. त्यामुळे धोनीला मैदानावर खेळताना पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असणार आहेत.