Vaibhav Suryavanshi: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर काल (सोमवारी) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३० चेंडूत शतक झळकावले आणि आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सूर्यवंशीने आयपीएलच्या इतिहासात भारताकडून सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा यूसूफ पठाणचा विक्रमही मोडला. यापूर्वी आयपीएलमध्ये यूसूफ पठाणने २०१० मध्ये राजस्थानकडूनच शतक झळकावले होते. तेव्हा तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला होता. तेव्हापासून कालपर्यंत त्याचा विक्रम अबाधित होता.
मात्र, काल गुजराज विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये ३० चेंडूत शतक केले. या खेळीबरोबर तो भारताकडून सर्वात कमी वयात आणि सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला. या खेळीनंतर अनेक दिग्गजांनी वैभवचे कौतुक केले आहे. अशात भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने एक गमतीशीर पोस्ट करत, “या मुलाने ‘आयपीएल’लाच लहान मुलांचा खेळ बनवले”, असे म्हटले आहे.
आपल्या एका ओळीच्या पोस्टमध्ये इरफान पठाण म्हणाला, “या मुलाने आयपीएलला मुलांचा खेळ बनवले आहे. वैभव सूर्यवंशीकडून अविश्वसणीय खेळी.”
सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि यूसूफ पठाणसारखे दिग्गज क्रिकेटपटूही राजस्थानच्या या युवा फलंदाजाच्या क्षमतेने प्रभावित झाले आहेत. त्यांनी वैभवचे खूप कौतुक केले आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम करणाऱ्या युसूफ पठाणनेही त्याचा विक्रम मोडल्याबद्दल वैभव सुर्यवंशीचे अभिनंदन केले आहे.
वैभवच्या खेळीचे कौतुक करताना युवराज सिंहने एक्सवर लिहिले की, “तुम्ही १४ वर्षांचे असताना काय करत होता? हा मुलगा डोळे मिचकावत जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना तोंड देत आहे! वैभव सूर्यवंशी, नाव लक्षात ठेवा! तो निर्भय वृत्तीने खेळत आहे. पुढच्या पिढीला चमकताना पाहून अभिमान वाटतो!”
तत्पूर्वी, सचिन तेंडुलकरनेही एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत वैभवच्या खेळीचे कौतुक केले आहे. सचिनने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “वैभवची खेळण्याची निडर पद्धत, फटका मारतानाचा बॅटचा वेग, चेंडूचा टप्पा लवकर ओळखणं आणि चेंडूच्या मागे आपली संपूर्ण ताकद एकवटणं ही वैभवच्या या भन्नाट खेळीची रेसिपी होती. परिणाम… ३८ चेंडूंमध्ये १०१ धावा! मस्त खेळलास”, अशी पोस्ट सचिन तेंडुलकरनं शेअर केली आहे.”