कोलकात्याविरुद्ध चौकार आणि षटकारांची बरसात करणाऱ्या इशान किशनने त्याच्या खेळीचे श्रेय संघातील सिनियर खेळाडूंना दिले आहे. ‘मी सामन्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी मला तुझ्या मनानुसार खेळ असा सल्ला दिला. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्यावर माझा भर होता आणि शेवटी आजचा दिवस माझा होता. मी चांगली खेळी करण्यात यशस्वी ठरलो, अशी प्रतिक्रिया किशनने दिली आहे.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत फारशी चमक दाखवू न शकलेला युवा फलंदाज इशान किशनला बुधवारी अखेर सूर सापडला. इशानच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने कोलकात्याविरोधात २१० धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात मुंबईने १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार इशान किशन ठरला.

इशान किशनने २१ चेंडूत ६२ धावा केल्या. यात ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. या खेळीनंतर इशानने प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, सामना सुरु होण्यापूर्वी मी संघातील काही सिनियर खेळाडूंशी चर्चा केली. त्यांनी स्वत:च्या मनानुसार खेळ असे सांगितले. मी तसाच खेळ केला. प्रत्येक चेंडूवर चांगला फटका कसा मारता येईल, यावर माझा भर होता. बहुधा आजचा दिवस माझाच होता. प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करण्यात मी यशस्वी ठरलो, असे त्याने सांगितले. फिरकी गोलंदाजांसमोर खेळताना मी त्यांच्या गोलंदाजीनुसार फलंदाजी करत होता. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. आम्हाला या मैदानावर चांगली धावसंख्या उभारणे गरजेचे होते आणि आम्ही यात यशस्वी ठरलो, असे त्याने सांगितले.