आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात चांगलीच अटीतटीची लढत झाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी एकमेकांशी दोन हात केले. मात्र राजस्थानसमोर मुंबईचा निभाव लागला नाही. राजस्थानने या सामन्यावर आपलं नाव कोरलं. संघातील फलंदाज आणि गोलंदाज यांनी चांगली कामगिरीमुळे केल्यामुळे राजस्थानाने मुंबईला अवघ्या १७० धावांवर रोखलं. दरम्यान, राजस्थानच्या या विजयासाठी युजवेंद्र चहलने मोठी मेहनत घेतली. मात्र या सामन्यात त्याच्या हातून हॅटट्रिकची मोठी संधी हुकली. करुण नायरने झेल सोडला नसता तर या हंगामातील पहिल्या हॅटट्रिकचा मान युजवेंद्र चहलला मिळाला असता.

करुण नायरने झेल सोडला आणि संधी हुकली

मुंबईची स्थिती १३६ धावांवर चार गडी बाद अशी असताना युजवेंद्र चहलने सोळावे षटक टाकण्यासाठी चेंडू हातात घेतला. युजवेंद्रने पहिल्याच चेंडूमध्ये टीम डेविडला बाद केले. पायचित झाल्यामुळे एक धाव करुन डेविड तंबूत परतला. त्यानंतर लगेच पुढच्या चेंडूवर डॅनियल सॅमने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र जोस बटलरच्या हातात चेंडू विसावल्यामुळे तो खातं न खोलताच तंबुत परतला.

एकापाठोपाठ दोन बळी गेल्यामुळे युजवेंद्रला हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली. युजवेंद्रने तिसरा चेंडू मोठ्या शिताफीने टाकला. यावेळी टाकलेल्या गुगलीवर मुरगन अश्विन गोंधळल्यामुळे चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागून स्लिपमध्ये उभा असलेल्या करुण नायरकडे गेला. मात्र हा सोपा झेल करुण नायरकडून सुटला. परिणामी युजवेंद्र चहलची हॅटट्रिकची संधी हुकली. करुण नायरने झेल पकडला असता तर या हंगामातील पहिली हॅटट्रिक युजवेंद्रच्या नावावर असती.

दरम्यान, हॅटट्रिकची संधी हुकलेली असली तरी युजवेंद्रने अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. त्याने एकापाठोपाठ दोन बळी घेतल्यामुळे सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजून झुकला. शेवटी राजस्थान रॉयल्सचा २३ धावांनी विजय झाला.