कोलकाता विरूद्ध दिल्लीच्या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला केकेआरच्या गोलंदाजांनी जास्त वेळ मैदानात टिकू दिले नाही आणि दिल्लीला अवघ्या १५३ धावांवर रोखण्यात त्यांना यश आले. केकेआरच्या गोलंदाजीदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. कोलकाताचा गोलंदाज हर्षित राणाने अभिषेक पोरेलच्या विकेटवर सेलिब्रेशन करता करता मध्येच थांबला, पण नेमकं काय घडलं.

हर्षित राणाने या सामन्यात ४ षटकांत २८ धावा देत २ विकेट्स घेतले. हर्षितने अभिषेक पोरेलला आपल्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड केले. पोरेलला त्रिफळाचीत केल्यानंतर हर्षित विकेटचं सेलिब्रेशन करायला गेला आणि त्याला त्याच्या शैलीत फलंदाजाला फ्लाइंग किस सेंड-ऑफ देण्यासाठी त्याने वर केला. पण तितक्यात हर्षितने स्वतःवर नियंत्रण ठेवतं शांत झाला. कारण त्याने हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशीच चूक केली होती आणि हे फ्लाईंग किस सेलिब्रेशन त्याला महागात पडले.

हर्षित राणाने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, त्याने मयंक अग्रवालची विकेट घेतल्यावर फ्लाइंग किस देत सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर बीसीसीआयने कारवाई केली आणि राणाला त्याच्या मॅच फीच्या ६० टक्के कपातीची शिक्षा ठोठावली. आता हर्षितने दिल्लीविरुद्धही हीच चूक केली असती तर त्याच्यावर पुन्हा कारवाई करण्यात आली असती. पण हर्षितने कसंबसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं तर केकेआरविरूद्धच्या या सामन्यात दिल्लीचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीकडून गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. ज्यामुळे दिल्लीला १५० धावांचा टप्पा गाठता आला. पण फिल सॉल्टच्या अर्धशतकामुळे केकेआरने सहज विजय नोंदवला.