लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा रोमांचक सामन्यात पराभव केला. यासह कोलकाता संघ आयपीएल-२०२२ मधून बाहेर पडला आहे. २११ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना जवळपास जिंकला होता, मात्र शेवटच्या षटकात रिंकू सिंहची विकेट पडल्याने त्यांचे स्वप्न भंगले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती, पण इथे विकेट पडली आणि लखनऊचा संघ जिंकला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे.

अखेरच्या तीन षटकांत पलटला होता संपूर्ण सामना

कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या तीन षटकात ५५ धावांची गरज होती, मात्र त्यांना ५३ धावा करता आल्या. रिंकू सिंहने अशी काही खेळी खेळली, जी वर्षातून एकदा खेळली जाते पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रिंकू सिंहने १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती आणि रिंकू सिंह क्रीजवर होता. लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने चेंडू हातात घेतला आणि शेवटच्या षटकात त्याने २ बळी घेतले आणि १८ धावा दिल्या.

केएल राहुल आणि डी कॉकचा विक्रम

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळून २० षटकात एकही विकेट न गमावता २१० धावा केल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉक १४० आणि कर्णधार केएल राहुल ६८ धावांवर नाबाद माघारी परतले. डी कॉकने मोसमातील पहिले शतक झळकावले. त्याने ७० चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १४० धावा केल्या. आयपीएलमधील डि कॉकची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचवेळी कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि ४ षटकार मारले. दोघांनी २१० धावांची सलामी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.

क्विंटन डी कॉकचे सहा वर्षानंतर दुसरे शतक

या महत्त्वाच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने शतक झळकावले. चालू मोसमात शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी ३ शतके झळकावली आहेत आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने २ शतके झळकावली आहेत. डी कॉक चालू हंगामात लखनऊकडून खेळत आहे. त्याने ५९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शतक झळकावले आहे. आयपीएलमधील त्याचे हे दुसरे शतक आहे. त्याने २०१६ मध्ये पहिले शतक झळकावले होते.