टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध आहे. धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉ़टचे आता अन्य फलंदाजही अनुकरण करताना दिसतात. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या इशान किशननेही हेलिकॉप्टर शॉट मारत चेंडू सीमेपार टोलावला आणि अवघ्या देशाला इशानच्या रुपात ‘डावखुरा धोनी’च दिसला.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात शिल्पकार ठरला इशान किशन. इशान किशनने २१ चेंडूत ६२ धावा ठोकून संघाला २०० चा पल्ला गाठून देण्यात मोलाची भूमिका निभावली.
इशान किशनने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मारलेला हेलिकॉप्टर शॉट लक्षवेधी ठरला. कुलदीपच्या गोलंदाजीवर इशानने धोनी स्टाइलने हेलिकॉप्टर शॉट मारला आणि चेंडू सीमेपार पाठवला. हा शॉट बघताच समालोचकांनीही डावखुरा धोनी अशा शब्दात त्याचे कौतुक केले.
https://twitter.com/SPOVDO/status/994253634954145792
आयपीएलमध्ये यंदाच्या पर्वात सर्वात वेगवान अर्धशक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इशान सुनील नरेनसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. लोकेश राहुलने १४ चेंडूत अर्धशतक ठोकून पहिले स्थान पटकावले आहे.
