SRH and KKR performance in playoffs : आयपीएल २०२४ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. साखळी फेरीनंतर आता प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. प्लेऑफचा पहिला सामना क्वालिफायर-१ हा आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करेल. त्यामुळे या दोन्ही संघांची प्लेऑफ्समधील आतापर्यंत कामगिरी कशी राहिली आहे? याबद्दल जाणून घेऊया.

हैदराबादने प्लेऑफमध्ये कशी कामगिरी केली?

यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी चांगलीच झाली आहे. सनरायझर्स हैदराबादने लीग टप्पा संपवून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. पण प्लेऑफ सामन्यांमध्ये संघाची कामगिरी काही विशेष राहीली नाही. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या प्लेऑफ्समध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. या कालावधीत सनरायझर्स हैदराबाद संघाने ५ सामने जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. मात्र, सनरायझर्स हैदराबादही एकदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाने आयपीएल २०१६ चे विजेतेपद पटकावले होते. या संघाने अंतिम फेरीत आरसीबीचा पराभव केला होता. यानंतर २०१८ मध्ये सनरायझर्सचा संघही फायनलमध्ये पोहोचला होता, पण तिथे त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

प्लेऑफ्समध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा दबदबा –

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानावर आहे. तो आठव्यांदा आयपीएल प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी दमदार राहिली आहे. आयपीएल प्लेऑफ्समध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. या कालावधीत केकेआरने ८ सामने जिंकले असून ५ सामने गमावले आहेत. केकेआर संघ आतापर्यंत क्वालिफायर-१ मध्ये एकही सामना हरला नाही. त्याचबरोबर एलिमिनेटरमध्ये दोनदा आणि क्वालिफायर-२ मध्ये दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत या संघाने दोनदा क्वालिफायर-१ खेळला आहे आणि दोन्ही वेळा अंतिम फेरी गाठून विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्मा खोटं बोलला? स्टार स्पोर्ट्सने हिटमॅनला दिले चोख प्रत्युत्तर, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

साखळी सामन्यात कोणत्या संघाने मारली बाजी?

आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत १ सामना खेळला गेला आहे. हा हाय स्कोअरचा सामना होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकांत केवळ २०४ धावा करता आल्या. अशा स्थितीत केकेआरने अवघ्या ४ धावांनी सामना जिंकला.