लखनऊ सुपर जायंट्स वि दिल्ली कॅपिटल्सचा सामना सध्या दिल्लीच्या घरच्या मैदानावर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना पंतच्या नेतृत्त्वाखालील संघाने २०८ धावा केल्या. आजच्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल विकेटकीपिंग करताना दिसला नाही. त्याच्या जागी क्विंटन डीकॉक विकेटकीपर होता. त्यामुळे या सामन्यात फिल्डिंग करताना राहुलने एक शानदार झेल टिपला, ज्यावर एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

लखनऊकडून दिल्लीच्या डावाचे ९वे षटक टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शे होप स्ट्राईकवर होता, त्याने या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू फार उंच गेला नाही आणि तेवढ्यातच कव्हर्सकडे उभ्या असलेल्या राहुलने त्याच्या दिशेने येणारा वेगवान चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू पकडू शकला नाही. मात्र, चेंडू त्याच्या हाताला लागला आणि हवेत गेला. याचा फायदा घेत राहुलने डायव्हिंग करताना अप्रतिम झेल घेतला. ३८ धावा करून होप बाद झाला. राहुलचा हा झेल पाहून लखनऊचे मालक संजीव गोयंका खूपच आनंदी झालेआणि त्यांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवल्या. गोएंका यांचे कौतुक करतानाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.हैदराबादविरूद्धच्या सामन्यात घडलेल्या प्रकारानंतर संजीव गोयंका राहुलला चिअर करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्याच्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.

हेही वाचा- IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

लखनऊचे मालक संजीव गोयंका सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १० विकेट्सने पराभूत झाल्यानंतर संघाचा कर्णधार केएल राहुलवर मैदानातच संतापले. यानंतर बराच गदारोळ झाला होता. या घटनेनंतर असे म्हटले जात होते की कदाचित केएल राहुल यापुढे संघाचे कर्णधारपदही सांभाळणार नाही आणि पुढच्या मोसमात फ्रँचायझी सोडेल. पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मालक संजीव गोयंका आणि राहुल यांच्यात सर्व काही सुरळीत झाले. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. तर गोयंका यांनी या सामन्यापूर्वी केएलसाठी घरी जेवणाचा बेतही आखला होता, ज्याचा फोटो व्हायरल झाला.

लखनऊचा संघ आयपीएलमध्ये तिसरा हंगाम खेळत आहे. याआधी दोन्ही वेळा संघाला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. मात्र सध्याच्या मोसमात संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण असल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२४ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्स संघाने १२ सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने ६ सामने जिंकले आहेत आणि१२ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. लखनऊचा नेट रन रेट उणे ७६९ आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लखनऊला आपले उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.