scorecardresearch

IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामाशी संबंधित सर्व महत्वाची माहिती, घ्या जाणून

Indian Premier League 2023: आयपीएलचा १६वा सीझन खूपच रोमांचक असणार आहे. या हंगामात काही बदल केले आहेत, ते कोणते आहेत जाणून घ्या.

IPL 2023 CSK vs GT Updates
आयपीएल ट्रॉफी (फोटो-ट्विटर)

IPL 2023 CSK vs GT Match Updates: आयपीएलच्या १६व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सयांच्यात होणार आहे. या मोसमात ७२ सामने होणार आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुहेरी हेडर म्हणजेच दोन सामने होतील. याशिवाय आयपीएल २०२३ मध्ये काही नवीन नियम असतील. इम्पॅक्ट प्लेयरचा नियम असेल. तसेच कमरेवरील चेंडू तपासण्यासाठी रिव्ह्यूचा वापर करता येणार आहे. त्याचबरोबर वाईड चेंडू तपासण्यासाठी देखील रिव्ह्यू वापरता येणार.

आयपीएल २०२३ किती काळ चालेल आणि किती सामने होतील?

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. २८ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेच्या १६व्या हंगामात एकूण ५२ दिवसांत ७२ सामने होतील. ज्यामध्ये ७० लीग सामने असतील. संघांची ५-५अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटाच्या संघाविरुद्ध २-२ सामने आणि इतर गट संघाविरुद्ध १-१ सामना खेळेल.

आयपीएल २०२३ चे सामने कुठे होणार?

आयपीएल २०२३ हंगामाचे सामने होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहेत. संघ आपल्या घरच्या मैदानावर एक सामना खेळणार आहे. दुसरा सामना दुसऱ्या संघाच्या घरच्या मैदानावर होणार आहे. लीग टप्पा १२ ठिकाणी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ धर्मशाला येथे त्यांचे दोन घरगुती सामने खेळणार आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघ गुवाहाटी येथे दोन घरगुती सामने खेळणार आहे.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs GT: एमएस धोनी पहिल्या सामन्यात खेळणार नाही? मग कोण सांभाळणार सीएकेचे धुरा, जाणून घ्या

आयपीएल २०२३ मध्ये नवीन नियम काय असतील?

आयपीएल २०२३ मध्ये इम्पॅक्ट प्लेयर हा नवा नियम असेल. यामुळे सामन्याच्या मध्यावर संघ प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल करू शकतील. त्यामुळे संघ ११ खेळाडूंसह पाच सब्स्टीट्यूट खेळाडूंची नावे देतील. संघ यापैकी एका खेळाडूचा वापर करु शकेल सक्षम असेल. याशिवाय वाईड किंवा नो बॉल तपासण्यासाठी डीआरएस घेतला जाऊ शकतो.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली सर्वाधिक धावा खेळाडू आहे. त्याने २१६ सामन्यांमध्ये ३६.४३च्या सरासरीने आणि १२९.७२च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक ६४११ धावा केल्या आहेत. त्याने पाच शतके आणि ४२ अर्धशतके झळकावली आहेत. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०० सामन्यांमध्ये ६०८६ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण आहे?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्याने १६१ सामन्यात २३.८२ च्या सरासरीने ८.३८च्या इकॉनॉमीसह १८३ विकेट्स घेतल्या आहेत. तो मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू लसिथ मलिंगा आहे. त्याने १२२ सामन्यात १७० विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा –IPL 2023 CSK vs GT: धोनीच्या संघात सामील झालेला आकाश सिंग कोण आहे? सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू कोण?

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंजाब किंग्जने त्याला १८.५० कोटींमध्ये खरेदी केले होते. दुसरीकडे, कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटींना तर चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सला १६.२५ कोटींना विकत घेतले. याआधी सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस होता. २०२१ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने ते १६.२५ कोटींना विकत घेतले.

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप म्हणजे काय आहे?

आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. याची घोडदौड संपूर्ण टूर्नामेंटमध्ये सुरू असते जो फलंदाज अव्वल असतो त्याच्या डोक्यावर ही टोपी असते. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ही कॅप मिळते. गेल्या वर्षी ऑरेंज कॅप राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने जिंकली होती.

आयपीएलमध्ये पर्पल कॅप म्हणजे काय आहे?

आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. संपूर्ण स्पर्धेत गोलंदाज त्यासाठी स्पर्धा करतात. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या डोक्यावर ही टोपी असते. टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला ही कॅप मिळते. गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने पर्पल कॅप जिंकली होती.

हेही वाचा – IPL 2023 Opening Ceremony: तब्बल चार वर्षांनी रंगणार उद्घाटन सोहळा! रश्मिका मंदाना, तमन्नासह हे तारे-तारका दाखवणार जलवा

आयपीएलमधील फेअरप्ले अवॉर्ड म्हणजे काय?

क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हटले जाते. आयपीएलमधील फेअरप्ले अवॉर्ड त्याच्याशी संबंधित आहे. संपूर्ण स्पर्धेत संघांमध्ये शर्यत असते. संघाच्या आणि मैदानावरील खेळाडूंच्या वर्तनानुसार गुण दिले जातात. स्पर्धेच्या शेवटी, उत्कृष्ट वर्तन असलेल्या संघाला फेअरप्ले पुरस्कार दिला जातो.

आयपीएलच्या प्लेऑफबद्दल जाणून घ्या –

आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्ये तीन सामने होतील. क्वालिफायर-१ गटातील अव्वल संघांमध्ये खेळला जाईल. सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ बाद होणार नाही. एलिमिनेटरमध्ये नंबर-३ आणि नंबर-४ यांच्यात सामना आहे. हा सामना हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर-२ मध्ये पराभूत संघाशी लढेल. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:02 IST

संबंधित बातम्या