KKR beat RCB by 1 runs : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३६वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एका धावेनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने श्रेयस अय्यरचा अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २२१ धावांवर गारद झाला.

कोलकाता नाईट रायडर्सने श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यातआरसीबीचा एका धावेने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत ६ गडी गमावून २२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण संघाला एकच धाव करता आली आणि पराभवाला सामोरे जावे लागले. विल जॅक आणि रजत पाटीदार यांच्यातील शतकी भागीदारी आणि शेवटच्या षटकात कर्ण शर्माची उत्कृष्ट कामगिरी असूनही त्यांना लक्ष्य गाठता आले नाही.

पाटीदारने आणि जॅक्सचे अर्धशतक ठरले व्यर्थ –

केकेआरसाठी श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले आणि अखेरीस रसेल आणि रमणदीप सिंगने वेगवान खेळी करत आरसीबीसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही, मात्र जॅकने ३२ चेंडूत ५५ धावांची तर रजत पाटीदारने ५२ धावांची खेळी करत आरसीबीला सामन्यात रोखले. तथापि, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी मधल्या षटकांमध्ये नियमित अंतराने आरसीबीच्या विकेट घेतल्या आणि केकेआरला सामन्यात परत आणले. आरसीबीचे फलंदाज वेगवान खेळ करत राहिले, पण दुसऱ्या टोकाकडूनही संघ विकेट्स गमावत राहिला.

हेही वाचा – KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल

शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची होती गरज –

आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती आणि आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. स्टार्कच्या पुढे कर्ण शर्माने तीन षटकार ठोकले. यानंतर आरसीबीला दोन चेंडूत तीन धावा हव्या होत्या, पण स्टार्कने कर्णला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती आणि लॉकी फर्ग्युसन स्ट्राइकवर होता. त्याने शेवटच्या चेंडूवर चांगला शॉट मारला पण दुसरी धाव पूर्ण करताना तो धावबाद झाला. अशाप्रकारे या रोमांचक सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला.