कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सचा प्रयत्न सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात लयीत असलेल्या पंजाब किंग्ज संघाविरुद्ध विजयी पुनरागमनाचा असेल. तीन जेतेपद मिळविणार्या कोलकाताची या हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यातच वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान, हर्षित राणा, आकाश दीप व मथीश पथिराना यांच्या अनुपस्थितीचा फटकाही संघाला बसला. मात्र, चुकीची रणनीतीही संघाच्या या पराभवांना कारणीभूत आहे.
संघाला २०२४ मध्ये जेतेपद मिळवून देणार्या श्रेयस अय्यरला व्यवस्थापनाने करारमुक्त केले आणि त्याचा फटका संघाला बसताना दिसत आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली गेल्या हंगामात पंजाब किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली होती. कोलकातासाठी गेला हंगाम फारसा चांगला नव्हता. २००९ नंतर ते प्रथमच आठव्या स्थानी राहिले. ट्वेन्टी-२० मधील खराब लयीनंतरही कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेंनी सर्वाधिक धावा करताना टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, चंद्रकांत पंडित यांच्या जागी अभिषेक नायरला मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देणे या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, श्रेयसच्या नेतृत्वाखाली पंजाबने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. युवा कूपर कोनोलीने तिसर्या स्थानावर दोन सामन्यांत १०८ धावा करीत संघासाठी योगदान दिले. तर, प्रियांध आर्य व प्रभसिमरन सिंग यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. श्रेयसनेही मध्यक्रमात चांगल्या खेळी केल्या आहेत. अर्शदीप सिंग, मार्को यान्सन आणि विजयकुमार वैशाक यांच्यामुळे वेगवान गोलंदाजी संतुलित दिसत आहे. तर, अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहलमुळे संघाची फिरकी गोलंदाजीही चांगली दिसत आहे.
* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, जिओहॉटस्टार ॲप.
