अनेक खेळाडूंचे बदललेले संघ, नवे दोन संघ आणि करोनाचे निर्बंध काढल्यामुळे स्टेडियममध्ये होणारी प्रेक्षकांची गर्दी यामुळे यंदाच्या आयपीएलची जोरदार चर्चा आहे. मात्र, यापेक्षाही मोठी चर्चा आहे ती यंदाच्या आयपीएलमध्ये सुरू असलेल्या अंपायरिंगची. आयपीएलच्या सामन्यांमध्ये अंपायर्सच्या चुकीच्या निर्णयांचा फटका खेळाडूंना बसत असल्याची आणि त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर होत असल्याची टीका केली जात आहे. नुकतीच बंगळुरू विरुद्ध लखनौ सामन्यामध्ये मार्कस स्टॉयनिसनं बाद झाल्यानंतर अंपायरवर व्यक्त केलेल्या संतापाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी परखड शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं झालं काय?

मंगळवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध लखनौ आयपीएल सामन्यामध्ये आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड १९वी ओव्हर टाकत होता. यावेळी समोर लखनौचा फलंदाज मार्कस स्टॉयनिस फलंदाजी करत होता. पहिला चेंडू हेझलवूडनं वाईड लाईनच्याही बाहेर टाकला होता. मात्र, अंपायरनी तो वाईड बॉल दिलाच नाही.

पण याच्याच पुढचा चेंडू देखील हेझलवूडनं वाईड लाईनच्या जवळ टाकला. यावेळी मार्कस स्टॉयनिस चेंडू मारण्यासाठी स्टंप सोडून पुढे सरकला आणि फटका मारण्याच्या नादात बोल्ड झाला. यानंतर स्टॉयनिसनं अंपायरवर संताप काढल्याचा व्हिडीओ देखील बराच व्हायरल झाला होता.

“फारच वाईट अंपायरिंग”

या प्रकारानंतर एकूणच आयपीएलमध्ये होत असलेल्या अंपायरिंगवर नाराजी व्यक्त केली. श्रीकांत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “आयपीएमध्ये अंपायरिंगला नक्की झालंय काय? फारच वाईट अंपायरिंग होत आहे. छोट्या चुकीच्या निर्णयांमुळे त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. जागे व्हा आणि योग्य व्यक्तींची त्या ठिकाणी निवड करा”, असं श्रीकांत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.