LSG win against CSK by 6 wickets : आयपीएल २०२४ मधील ३९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये लखनऊने मार्कस स्टॉयनिसच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. या विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या एका चाहत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एलएसजीचा चाहता सीएसकेच्या चाहत्यांच्या गराड्यात एकटाच लखनऊच्या विजयानंतर आनंदा व्यक्त करताना दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला होता. जिथे चेन्नईचे हजारो चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊने विजय मिळवला. पण लखनऊच्या विजयानंतर त्याच्या एका चाहत्याने असे सेलिब्रेशन केले, ज्यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान हजारो चाहते चेन्नई सुपर किंग्जला पाठिंबा देण्यासाठी आले असताना एकीकडे चाहत्यांच्या पिवळ्या समुद्रात लखनऊ सुपर जायंट्सचे चाहते मोठ्या आशेने आपल्या संघाला पाठिंबा देत होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाने सामन्याच्या पहिल्या डावात आपला दबदबा कायम ठेवला, तेव्हा हा चाहता खूपच निराश झालेला दिसत होता. दुसऱ्या डावातही पहिल्या काही षटकांमध्ये असेच दृश्य होते, पण लखनऊ सुपर जायंट्सने सामन्यावर पकड मजबूत केल्याने चाहत्याने जल्लोष करायला सुरुवात केली. त्यानंतर एलएसजीने सामना जिंकताच या चाहत्याने कॅमेरामॅनचेही लक्ष वेधून घेतले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL 2024: गुरूची विद्या गुरूला! धोनी गुरुजींना स्टॉइनसची गुरूदक्षिणा

सामन्याबद्दल बोलायचे तर, एलएसजीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून २१० धावा केल्या. यादरम्यान कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद शतक झळकावले. दुसऱ्या डावात लखनऊचा संघ जेव्हा या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा अवघ्या ८८ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या, पण मार्कस स्टॉइनिसने हार मानली नाही आणि अखेरच्या षटकात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान स्टॉइनिसने ६३ चेंडूत १२४ धावांची नाबाद खेळी साकारली.