लखनौ सुपर जायंट्स संघाला सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध प्लेऑफसाठी महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. य पराभवासह लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. यासह लखनौ सुपर जायंट्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार पाचवा संघ ठरला. या सामन्यात संघाचा कर्णधार ऋषभ पंत स्वस्तात बाद झाला. हे पाहून संजीव गोयंका वैतागले होते. तर सामन्यानंतरही त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

हैदराबादविरूद्ध या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला पण इशान मलिंगाने त्याच्याच चेंडूवर एक उत्कृष्ट झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. पंतची विकेट पडल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका वैतागलेले दिसले. लखनौच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात ऋषभ पंत लवकर बाद झाला. यावेळेस संजीव गोयंका बाल्कनीमधून सामना पाहत होते. पण पंत बाद होताच ते वैतागून बाल्कनीमधून आतमध्ये निघून गेले. ज्याचा व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांना त्यांच्या संघाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांनी आयपीएल २०२५ साठी जोरदार तयारी केली होती आणि मेगा लिलावात ऋषभ पंतला घेण्यासाठी २७ कोटी रुपयांची बोली लावली होती. पंत व्यतिरिक्त, लखनौच्या संघात निकोलस पूरन, मिचेल मार्श, एडन मारक्रम आणि डेव्हिड मिलरसारखे अव्वल खेळाडू होते, परंतु लखनौचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही.

लखनौला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांचा प्रवास गट टप्प्यातच संपला. पंतची वैयक्तिक कामगिरीही चांगली नव्हती, त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान संघाचे मालक गोयंका यांनी संघाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

संजीव गोयंका यांनी सोशल मीडियावर संघातील खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आणि या मोहिमेतून संघ कसा शिकेल हे स्पष्ट केलं. या फोटोमध्ये गोयंका ऋषभ पंतच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. त्याच्याशिवाय आकाशदीप, शार्दुल ठाकूर,अब्दुल समद असे काही खेळाडूही आहेत. तर पंत आणि गोयंका यांच्या चेहऱ्यावर हसू आहे.

गोयंका यांनी शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हंगामाचा दुसरा भाग खूप आव्हानात्मक होता, परंतु त्यातून बरंच काही शिकायला मिळालं आहे. संघाचा उत्साह, त्यांनी केलेले प्रयत्न आणि सामन्यादरम्यानचे काही उत्कृष्ट क्षण आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. संघाचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. चला अभिमानाने खेळूया आणि या हंगामाचा शेवट दमदारपणे करूया.

सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला आणि त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांत सात गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबादने १८.२ षटकांत चार गडी गमावून २०६ धावांचं लक्ष्य गाठलं आणि विजय मिळवला.