चेन्नई व पंजाब या दोन संघांमध्ये असलेल्या फरकाबाबत बोलताना मुजीब उर रेहमान व ख्रिस गेलचं नाव महेंद्र सिंग धोनीनं घेतलं. धोनीच्या 44 चेडूंमधे 79 धावा सामन्याचा सर्वोच्च बिंदू होता, परंतु सामना जिंकण्यासाठी चेन्नईला अवघ्या चार धावा कमी पडल्या. ख्रिस गेलची 33 चेंडूंमध्ये 66 धावांची झंझावाती खेळी व मुजीबची अप्रतिम गोलंदाजी पंजाबसाठी महत्त्वाची ठरल्याचे धोनीनं म्हटलं आहे.

अंबती रायडू व धोनीनं पंजाबच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत विजयाच्या समीप चेन्नईला नेलं परंतु या हाय स्कोअरिंग मॅचमध्येही मुजीबनं तीन षटकांमध्ये अवघ्या 18 धावा दिल्या व संघासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली. गेलची झंझावाती खेळी व मुजीबची अत्यंत चांगली गोलंदाजी या दोन गोष्टींमुळे विजयाचं पारडं पंजाबकडे झुकल्याचं धोनीनं म्हटलं आहे.

बॅटिंग ऑर्डरमध्ये ब्लाव्हो व जाडेजाला पसंती का देतो हे सांगताना धोनी म्हणाला की, आम्हाला जाडेजावर भरोसा आहे, रैना हा डावखुरा फलंदाज वरच्या फळीत खेळताना नंतर जाडेजा असेल तर त्याला चांगली संधी मिळेल असं धोनी म्हणाला. त्याला अद्याप योग्य संधी मिळाली नसल्याचे धोनी म्हणाला.
पाठदुखीचा तोडा त्रास होत असूनही धोनीनं त्यावर मात करत रविवारी चांगली कामगिरी केली व संघाला विजयाच्या समीप नेलं.

सामना हरूनही शेवटच्या चेंडूवर धोनीनं षटकार लगावला व शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहण्याची वृत्ती त्यानं दाखवली. पाठ फारच दुखत होती, परंतु देवदयेने मी खेळू शकलो असं त्यानं नंतर म्हटलं आहे. अर्थात, ज्या पद्धतीचे फटके मी मारतो त्याच्यासाठी पाठिची नाही तर दोन्ही बाहुंची गरज असते असंही त्यानं म्हटलं आहे.