इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १९व्या हंगामाला (२८ मार्चपासून) सुरुवात होणार असून संभाव्य विजेत्यांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. दोन विश्वविजेते कर्णधार (रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव), विश्वातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमरा), नामांकित अष्टपैलू (हार्दिक पंड्या, विल जॅक्स), तसेच अन्य एका राष्ट्रीय संघाचा कर्णधार (मिचेल सँटनर) अशी मुंबई संघाची ताकद. कागदावर सर्वांत मजबूत आणि परिपूर्ण दिसणारा हा संघ, आता प्रत्यक्ष मैदानावरही लौकिकाला साजेशी कामगिरी करून २०२० सालापासूनचा ‘आयपीएल’ जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, याकडेच सर्वांचे लक्ष असेल.
अपयशाची मालिका…
मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे पाच वेळा ‘आयपीएल’च्या चषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या (चेन्नईसह संयुक्तपणे) नावेच आहे. मात्र या वर्चस्वानंतर मुंबई संघाला गेल्या पाच वर्षांत मोठ्या यशाने हुलकावणी दिली आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी रोहितला कर्णधारपदावरून हटवून मुंबईच्या व्यवस्थापनाने चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. कर्णधार म्हणून रोहितची जागा घेणाऱ्या हार्दिक पंड्याला फारसे यश मिळवता आले नाही. त्यातच चाहत्यांनी त्याच्याविरुद्ध शेरेबाजीही केली. याचा परिणाम हार्दिकच्या आणि पर्यायाने मुंबई संघाच्या कामगिरीवर झाला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली पहिल्या हंगामात २०२४ मध्ये मुंबईला १४ पैकी केवळ चार सामने जिंकता आले. त्यामुळे मुंबई संघ गुणतालिकेत तळाला राहिला. पुढील हंगामात मुंबईने १४ पैकी ८ सामने जिंकत ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले. मात्र ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या (पंजाब किंग्ज) झंझावाती खेळीने मुंबई संघाला निष्प्रभ केले. आता यंदाच्या हंगामात कामगिरी अधिक उंचावण्याचा मुंबई संघाचा मानस असेल.
हार्दिकचे नेतृत्व
आजवर तीन भारतीय कर्णधारांना ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावण्याचा मान मिळाला असून यापैकी दोघे (रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव) मुंबई इंडियन्सचा भाग आहेत. मात्र या दोघांना हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. आता हे तिघे एकमेकांशी कसे जुळवून घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हार्दिकच्या नेतृत्वाची खरी कसोटी ही ‘मॅन मॅनेजमेंट’मध्ये आहे. संघात अनेक वरिष्ठ आणि जागतिक दर्जाचे खेळाडू असल्याने त्यांच्यात समन्वय राखणे गरजेचे आहे. २०२४ मध्ये नेतृत्वबदलानंतर निर्माण झालेली अस्वस्थता ही अजून पूर्णपणे विसरली गेलेली नाही. त्यामुळे यंदा संवाद, पारदर्शकता आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया यावर भर देणे आवश्यक आहे. योग्य वातावरण निर्माण करण्यात हार्दिक यशस्वी ठरला तर त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसेल.
दर्जेदार फलंदाजांचा भरणा…
यंदाचा मुंबई संघ संतुलन, खोली आणि अनुभव या तिन्ही बाबतीत प्रभावी दिसतो. आघाडीपासून ते अगदी आठव्या-नवव्या क्रमांकापर्यंत सक्षम फलंदाज आहेत. रोहित शर्मा सलामीला खेळणार हे निश्चित. मुंबईकडे अन्य सलामीचा फलंदाज आणि यष्टिरक्षक अशा दुहेरी भूमिकेसाठी क्विंटन डिकॉक व रायन रिकल्टन या दोन दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा पर्याय आहे. सध्या डिकॉकचे पारडे जड मानले जात आहे. अलीकडेच ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेले सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि हार्दिक हे मधल्या फळीची धुरा सांभाळतील. विजयवीर अर्थात ‘फिनिशर’च्या भूमिकेसाठी नमन धीर याच्यासह इंग्लंडचा विल जॅक्स आणि वेस्ट इंडिजचा शर्फेन रुदरफोर्ड यांच्यापैकी कोणाची निवड करायची, हा पेच मुंबई संघासमोर आहे. जॅक्सने ट्वेन्टी-२० विश्वचषकात फलंदाजीत अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली होती आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीने महत्त्वाचे बळीही मिळवले होते. या स्पर्धेत तो तब्बल चार वेळा सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यामुळे सध्याची लय पाहता जॅक्सला प्रथम संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच प्रामुख्याने गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे शार्दूल ठाकूर, दीपक चहर आणि मिचेल सँटनर हेसुद्धा फलंदाजीत योगदान देण्याची क्षमता राखून आहेत. त्यामुळे यंदा मुंबई संघाकडून सातत्याने मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.
बुमरा-बोल्ट जोडी
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा मुंबईची गोलंदाजी अधिक भक्कम दिसते. जसप्रीत बुमरा गेल्या दोन ‘आयपीएल’मध्ये दुखापतींशी झगडून खेळत होता. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याने निर्णायक टप्प्यावर सर्वोत्तम कामगिरी करून भारताच्या यशात मोलाचे योगदान दिले होते. तो अशीच कामगिरी ‘आयपीएल’मध्येही करेल अशी मुंबईला आशा असेल. तो मधल्या आणि अखेरच्या षटकांत अधिक गोलंदाजी करणे अपेक्षित आहे. नव्या चेंडूची जबाबदारी ट्रेंट बोल्ट सांभाळेल. दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यात सक्षम असलेल्या बोल्टने सुरुवातीला बळी मिळवणे मुंबईसाठी महत्त्वाचे ठरेल. त्याच्यासह शार्दूल, दीपक चहर आणि हार्दिक यांच्यापैकी एक जण नवा चेंडू हाताळेल.
भारतीय फिरकीची उणीव
भारतीय फिरकीपटू हा मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरू शकेल. मुंबईने यंदाच्या हंगामापूर्वी लेग-स्पिनर मयांक मार्कंडेला पुन्हा संघाचा भाग बनवले. मार्कंडेने यापूर्वी ‘आयपीएल’मध्ये काही सामन्यांत छाप पाडली आहे. परंतु कामगिरीत सातत्य राखणे हे त्याच्यासमोरील मोठे आव्हान असेल. परदेशी फिरकीपटूंमध्ये मुंबईकडे न्यूझीलंडचा सँटनर आणि अफगाणिस्तानचा अल्ला घझनफर यांचा पर्याय उपलब्ध आहे. दुखापतीमुळे घझनफर गेल्या संपूर्ण हंगामाला मुकला होता. आता त्याला संघातील स्थानासाठी सँटनरशी स्पर्धा करावी लागेल.
‘फिट’ रोहितची कामगिरी निर्णायक?
माजी कर्णधार रोहित शर्मा आता अधिक तंदुरुस्त आणि सक्रिय दिसत आहे. ही बाब मुंबई संघाच्या पथ्यावर पडू शकेल. गेल्या हंगामात रोहित प्रामुख्याने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या (प्रभावी खेळाडू) रूपात खेळला होता. म्हणजेच, फलंदाजी झाल्यानंतर त्याला मैदानाबाहेर बोलावून त्याच्या जागी एका गोलंदाजाला संधी दिली जात होती; परंतु आता वजन घटवलेला रोहित मैदानात अधिक काळ थांबू शकेल आणि आवश्यकता वाटल्यास हार्दिकला वेळोवेळी सल्लेही देऊ शकेल. तसेच फलंदाज म्हणूनही छाप पाडण्यास तो उत्सुक असेल. रोहित २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यास इच्छुक आहे. ‘बीसीसीआय’ची निवड समिती एकदिवसीय संघातील संभाव्य खेळाडूंची कामगिरी आणि तंदुरुस्ती याकडे ‘आयपीएल’मध्ये लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे रोहितला ‘आयपीएल’मध्ये दमदार कामगिरी करावी लागले. यात त्याला यश आले, तर याचा फायदा मुंबई संघालाही होईल, हे निश्चित!
