आयपीएल २०२५ मध्ये आज सनरायझर्स हैदराबादचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळत आहे. या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील भारतीय संघाचा खेळाडू मोहम्मद शमीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे राहणाऱ्या शमीला ही धमकी देण्यात आली आहे. शमीला ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहम्मद शमीचा भाऊ हसीबने अमरोहा पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे, त्यानंतर अमरोहाचे पोलिस अधीक्षक अमित कुमार आनंद यांच्या आदेशानुसार, अमरोहा सायबर सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा भाऊ हसीबने अमरोहाच्या पोलिस अधीक्षकांना सांगितले की, रविवारी मोहम्मद शमीच्या मेलवर एक मेल आला. या मेलमध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेलच्या आधारे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचे मोहम्मद शमीचा भाऊ हसीबने सांगितले आहे.
४ मे रोजी दुपारी २-३ च्या सुमारास मोहम्मद शमीला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. यानंतर क्रिकेटपटूने ताबडतोब त्याचा मोठा भाऊ आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादला कळवले. मोहम्मद शमीचा भावाने तक्रार दाखल केल्यानंतर धमकीचा मेल कोणी पाठवला, तो कुठून आला आणि त्यामागील हेतू काय होता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोहम्मद शमीच्या आधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही जीवे मारण्याच्या धमक्यांचे ईमेल आले होते. याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. तपासानंतर पोलिसांनी गुजरातमधील एका व्यक्तीला अटक केली.
मोहम्मद शमी हा सध्या भारताच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी ६४ कसोटी, १०८ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २२९, एकदिवसीय सामन्यात २०६ आणि टी-२० मध्ये २७ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचाही भाग होता.