MS Dhoni announcement on way : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२४ चा शेवटचा होम लीग सामना आज, रविवारी, १२ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळत आहे. सुपर संडेचा हा पहिलाच सामना आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईने चाहत्यांना सामन्यानंतर मैदानावर थांबण्याची खास विनंती केली आहे. याबाबत सीएसकेने एक्सवर एक खास पोस्ट करुन माहिती दिली आहे. ज्याचा संबंध चाहते एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्तीशी जोडत आहेत. चेन्नईच्या या घोषणेनंतर अनेक चाहते भावूकही झाले असून त्यांची धाकधूकही वाढली आहे.

एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा राजस्थान विरुद्ध सामना होत आहे. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचा हा शेवटचा सामना असेल. या सामन्यापूर्वी, चेन्नईने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी केली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहले, “सुपर चाहत्यांना सामन्यानंतर येथे थांबण्याची विनंती आहे. कारण सामन्यानंतर तुमच्यासाठी एक खास गोष्ट घेऊन येत आहोत.” अशा प्रकारे सीएसकेने चाहत्यांना सामना संपल्यानंतर थांबण्याची विनंती केली आहे.

सीएसकेने ही पोस्ट शेअर करताच लोकांनी त्याचा संबंध संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीशी जोडण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, “आज मी नक्कीच रडणार आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “हे आणखी भयानक आहे.” आणखी एका युजरने विचारले, “हा धोनीचा शेवटचा सामना असेल का?”

हेही वाचा – IPL 2024 : कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ

राजस्थानने चेन्नईला दिले १४२ धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे, तर सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १४१ धावांवर रोखले. राजस्थानकडून रियान परागने ३५ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४७ धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र या सामन्यात राजस्थानची फलंदाजी खूपच खराब झाली. संघाचे फलंदाज सुरुवातीपासूनच धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. चेन्नईसाठी सिमरजीत सिंगने शानदार गोलंदाजी केली आणि राजस्थानला सुरुवातीचा धक्का दिला, ज्यामुळे त्याच्या इतर फलंदाजांवर दबाव वाढला. यातून राजस्थानचे फलंदाज शेवटपर्यंत सावरले नाहीत आणि १५० धावाही करू शकले नाहीत.

आयपीएल २०२४ मधील एमएस धोनीची कामगिरी –

एमएस धोनीने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून अनेक षटकार आणि चौकार आले, ज्याने चाहत्यांचे मनोरंजन केले. धोनीने चालू मोसमात आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६८ च्या सरासरीने आणि २२६.६७ च्या स्ट्राइक रेटने १३६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ११ चौकार आणि १२ षटकार मारले आहेत.