नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आणखी लांबली असून ‘आयपीएल’ क्रिकेटमध्ये आज, मंगळवारी होणार्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यालाही तो मुकणार आहे. त्याने दिल्लीला प्रवास करणेही टाळले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात धोनीला पहिला सामना खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
चेन्नई आणि दिल्ली या दोनही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही संघांच्या खात्यावर आठ गुण असून त्यांचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांत दर्जेदार खेळ करावा लागेल. दिल्लीने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून सलग तीन पराभवांची मालिका खंडित केली. परंतु दिल्लीसाठी घरच्या मैदानावरील गेले दोन सामने निराशाजनक ठरले आहेत. प्रथम त्यांना पंजाब किंग्जविरुद्ध तब्बल २६४ धावांचाही बचाव करता आला नाही.
मग रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ अवघ्या ७५ धावांत गारद झाला. त्यामुळे आता घरच्या मैदानावर खेळताना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत खेळ उंचावण्याचा त्यांचा मानस असेल. लयीत असलेल्या केएल राहुलवर दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीत कर्णधार अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि मिचेल स्टार्क यांच्याकडून अपेक्षा असतील.
दुसरीकडे, चेन्नईच्या संघाला सलग १०व्या सामन्यात धोनीविना खेळावे लागणार आहे. धोनी पायाच्या दुखापतीतून सावरत असून अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल, असे चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. धोनीच्या अनुपस्थितीत खेळताना चेन्नई संघाने हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवांसह केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी सहापैकी चार सामने जिंकले आहेत. आता ‘प्ले-ऑफ’साठी आव्हान शाबूत राखण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.
* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
