भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीनं याआधीच आयपीएल वगळता इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या धक्क्यातून त्याचे चाहते सावरतात न सावरतात, तोच महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या चाहत्यांना अजून एक मोठा धक्का दिला आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना महेंद्रसिंह धोनीनं CSK अर्थात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे सोपवलं आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

सलामीच्या लढतीआधीच कर्णधारपदावरून पायउतार!

येत्या २६ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असून सलामीची लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या परंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे. मात्र, आयपीएलच्या सलामीच्या लढतीच्या दोन दिवस आधीच धोनीनं हा निर्णय जाहीर केल्यामुळे त्याच्या चाहत्यांसोबतच क्रिकेटप्रेमींनाही धक्का बसला आहे. धोनीनं याआधी देशासाठीच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना देखील अशाच प्रकारे चाहत्यांना धक्का दिला होता. त्यामुळे ‘कॅप्टन कूल’च्या ‘कूल’ कॅप्टन्सीला क्रिकेटप्रेमी मुकणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

माहीची अव्वल कामगिरी!

कर्णधार म्हणून माहीनं आत्तापर्यंत आयपीएलमध्ये इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त सामने खेळले आहेत आणि जिंकून देखील दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे जायंट्स या दोन्ही संघांसाठी मिळून धोनीने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत २०४ सामने खेळले आहेत. त्यातल्या १२१ सामन्यांमध्ये विजय तर ८२ सामन्यांमध्ये पराभवर स्वीकारला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे धोनीचं कर्णधार म्हणून विजयी होण्याचं प्रमाण तब्बल ५९.६० टक्के इतकं आहे.

सुरेश रैनाला हे आधीच माहिती होतं?

यंदाच्या आयपीएल हंगामाआधी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये लागलेल्या बोलीत महेंद्रसिंह धोनीला १२ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं, तर रवींद्र जाडेजासाठी तब्बल १६ कोटींची बोली लागली. त्यामुळे तेव्हाच चेन्नईच्या संघात हा मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. दोन दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्जसाठी माहीनंतर कोण कर्णधार होऊ शकेल, यासंदर्भात अंदाज बांधताना सुरेश रैनानं घेतलेल्या नावांमध्ये देखील रवींद्र जाडेजाचं नाव आघाडीवर होतं. रवींद्र जाडेजा, अंबाती रायुडू, रबिन उथप्पा आणि ड्वेन ब्राव्हो अशी चार नावं सुरेश रैनानं सुचवली होती.

धोनीच्या या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांकडून नाराजीच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

सोशल मीडियावर आपल्या लाडक्या कर्णधाराकडे काहींनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.