MS Dhoni Acknowledges Fans Chanting For Him At Ekana Stadium : महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेट विश्वातील फार मोठे यशस्वी नाव आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. सध्या ज्या शहरांत आयपीएलचे सामने रंगतात, त्या शहरांत धोनीच्या नावाचा एकच जयघोष केला जात आहे. त्यातून चाहत्यांमध्ये धोनी ऊर्फ थालाविषयी असलेली क्रेझ कायम दिसून येते. १९ एप्रिलच्या रात्री आयपीएलचा ३४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लखनौमधील इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. तसे बोलायचे म्हटले, तर लखनौ सुपर जायंट्सचं ते होम ग्राउंड होतं; पण चर्चा फक्त माहीच्याच होत होत्या. चाहते ‘धोनी धोनी’च्या घोषणा देत होते. आता त्या सामन्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये धोनीने भरमैदानात केलेली एक कृती चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

महेंद्रसिंह धोनी याने नेमके काय केले याची उत्सुकता तुम्हाला असेलच. तर वेळ न घालवता, ती घटना समजून घेऊ. इकाना क्रिकेट स्टेडियममधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये धोनी सीमारेषेवर उभा आहे. यावेळी धोनीला अगदी जवळून पाहायला मिळाल्याने चाहते आनंदून खूप जल्लोष करताना दिसत आहेत. प्रेक्षकांनी धोनी – धोनी, असा त्याच्या नावाचा धोशा लावल्याचे दिसत आहे. ते ऐकून धोनीही चाहत्यांकडे पाहतो आणि दोन्ही हात जोडून त्यांचे आभार मानतो. धोनीने त्या कृतीने सर्व चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हेही वाचा- धोनीच्या एन्ट्रीनंतरचा स्टेडियममधील ‘तो’ माहोल प्रेक्षकांसाठी ठरू शकतो घातक! क्विंटन डिकॉकच्या पत्नीने पोस्ट केला PHOTO

लखनौमध्ये धोनीची हवा

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारून, चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांमध्ये सहा विकेटवर १७६ धावा केल्या. मात्र, धोनीमुळेच सीएसकेला ही मजल मारणे शक्य झाले होते. सरतेशेवटी माहीने आपल्या ‘फिनिशर’ फॉर्ममध्ये फलंदाजी करीत लखनौच्या गोलंदाजांना नामोहरम केले.

धोनीने केवळ नऊ चेंडूंमध्ये ३११ च्या तुफानी स्ट्राईक रेटने नाबाद २८ धावा केल्या. धुवांधार फलंदाजी करताना त्या खेळीत त्याने तीन चौकार व दोन षटकार, अशी फटक्यांची आतषबाजी केली. अशा प्रकारे या आयपीएल हंगामामध्ये माही कमी चेंडूंमध्ये वेगाने धावा काढताना दिसला आहे.