MI Players Emotional Video : इंडियन प्रीमियर लीग २०२४ ( IPL 2024) च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची सर्वांत वाईट कामगिरी पाहायला मिळाली. पाच वेळा चॅम्पियन राहिलेला हा संघ यंदा मात्र आठ गुणांसह गुणतालिकेत सर्वांत खालच्या स्थानी राहिला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला १४ सामन्यांपैकी फक्त चार सामनेच जिंकता आले; तर उर्वरित १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या या खराब कामगिरीने चाहतेही खूप निराश झाले. त्यात आयपीएल २०२४ च्या शेवटच्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळताना मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. या शेवटच्या मॅचनंतरचा मुंबई इंडियन्स टीमच्या खेळाडूंचा ड्रेसिंग रूममधील एक अतिशय भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मासह हार्दिक पांड्या आणि इतर खेळांडूच्या चेहऱ्यावरील निराशाजनक भाव स्पष्ट दिसून येत आहेत.

मुंबई इंडियन्स टीमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘क्षण’ असे मराठीत लिहिले आहे; तर बॅकग्राउंडला ‘टिक टिक वाजते डोक्यात’ हे गाणे वाजतेय. व्हिडीओच्या सुरुवातीलाच शेवटची मॅच हरल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे तणावग्रस्त चेहरे दिसून येतायत. त्यानंतर टीमबरोबर मालकीण नीता अंबानी सर्वांबरोबर शेवटची चर्चा करीत, त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना दिसताय. त्यात रोहित शर्मा आणि कॅप्टन हार्दिक पांड्या अतिशय हताश, निराश चेहऱ्याने ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री करतात. दुसरीकडे काही खेळाडू अनेक आठवणी गोळा करीत आपल्या बॅग पॅक करण्यात व्यग्र आहेत. काही खेळाडू आपल्या आवडत्या खेळाडूंच्या ऑटोग्राफ्स घेण्यात, तर काही त्यांच्या खास वस्तू वाटण्यात व्यग्र आहेत. अशा प्रकारे शेवटच्या मॅचनंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू काहीसे भावूक होताना दिसले. प्रत्येकासाठी हा एक हृदयद्रावक क्षण होता. हा व्हिडीओ पाहून चाहतेही खूप भावूक झाले.

अनेकांनी व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये मुंबई इंडियन्स संघाला शुभेच्छा देत रडण्याची इमोजी शेअर केल्यात. आता राहिलेल्या मॅचेसमध्ये मुंबई इंडियन्स संघ दिसणार नसल्याने चाहते निराश होताना दिसतायत. अनेक चाहत्यांनी खास रोहित शर्मासाठी कमेंट्स केल्यात. तसेच रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सबरोबर खेळणार की नाही, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.

“मुंबई इंडियन्स सोडतोयस की काय?” रोहित शर्माने शेअर केलेल्या “त्या’ PHOTOS मुळे चाहते चिंतेत

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघ सुरुवातीपासूनच वादात होता. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यापासून चाहते निराश होते. चाहत्यांनी पांड्याला तर टीकात्मक शब्दांनी घायाळ केले होते. पहिल्या सामन्यापासून जो वाद सुरू झाला, तो शेवटच्या सामन्यापर्यंत सुरूच होता. अनेकदा खेळाडूंमध्येच वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडाले; पण आता हेच खेळाडू शेवटच्या मॅचनंतर ड्रेसिंग रूममध्ये भावूक होताना दिसले.