Sanjana Ganesan Reacts On Angad Viral Video : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. घरच्या मैदानावर खेळताना मुंबईने लखनऊवर एकतर्फी विजयाची नोंद केली. रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत जोर लावला, तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची हवा पाहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात अवघ्या २२ धावा खर्च करत ४ गडी बाद केले.

बुमराहची गोलंदाजी पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले फॅन्स एकच जल्लोष करत होते. यादरम्यान कॅमेरामनची नजर संजना गणेशन आणि ज्युनियर बुमराह म्हणजेच अंगदवर पडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मात्र, हे संजना गणेशनला मुळीच आवडलेलं नाही. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे.

संजना गणेशनचं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना झाल्यानंतर संजना गणेशनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिने लिहिले, “ आमचा मुलगा हा मनोरंजनाचा विषय नाही, आम्ही अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. कॅमेऱ्यांनी भरलेल्या स्टेडियममध्ये लहान मुलाला आणण्याचे परिणाम मला माहीत आहेत. पण, आम्ही केवळ जसप्रीतला सपोर्ट करण्यासाठी आलो होतो, त्यापलीकडे आणखी काहीच नाही.”

तसेच तिने पुढे लिहिले की, “ आमचा मुलगा इंटरनेटवर व्हायरल व्हावा यात आम्हाला अजिबात रस नाही. केवळ तीन सेकंदाच्या व्हायरल क्लिपवरून हे लोकं ठरवतील की अंगद कोण आहे, त्याला काय समस्या आहेत आणि त्याचा स्वभाव कसा आहे.” ही स्टोरी जसप्रीत बुमराहनेदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे.