मुंबई इंडियन्सचा आज राजस्थान रॉयल्सशी सामना
गेल्या काही वर्षांचा कित्ता पुन्हा गिरवताना अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये कामगिरी उंचावत बाद फेरी गाठण्याची परंपरा यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कायम राखण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्सची वाटचाल सुरू आहे. पराभवांची मालिका खंडित करीत तीन सलग विजय साकारणारा मुंबईचा संघ रविवारी वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सशी झुंजणार आहे. राजस्थानचे नेतृत्व अजिंक्य रहाणे आणि मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा करीत असल्याने रविवारच्या सामन्याला ‘मुंबईकर कर्णधारांमधील सामना’ असे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
२०१५च्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या सहापैकी पाच सामने गमावल्यानंतरही मुंबईने विजेतेपद पटकावले होते. यंदा प्रारंभीच्या खराब कामगिरीनंतर मुंबईच्या कामगिरीत नाटय़मय कलाटणी मिळाली आहे. या तीन विजयांपैकी दोन विजय हे कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आहेत. यापैकी कोलकातामधील १०२ धावांनी मिळवलेल्या विजयानंतर मुंबईने आयपीएल गुणतालिकेत अप्रतिम निव्वळ धावगतीसह चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. मुंबईच्या खात्यावर ११ सामन्यांत १० गुण जमा आहेत. राजस्थाननेही ११ सामन्यांतून १० गुण कमवले आहेत. त्यामुळे रविवारच्या लढतीत पराभूत झालेल्या संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेले असेल.
आयपीएल अध्र्यावर आल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी कामगिरी उंचावली. अपवाद फक्त इविन लेविसचा होता. सूर्यकुमार यादव कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात आहे. रोहितकडून त्याच्या दर्जाला साजेशी एकमेव खेळी साकारता आली आहे. वानखेडेवर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध ९४ धावा केल्या होत्या. यादव, रोहित, लेविस, इशान किशन आणि जेपी डय़ुमिनी यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची मदार आहे. मात्र त्यांना मधल्या फळीची प्रमुख चिंता जाणवते आहे. बेन कटिंग, कृणाल आणि हार्दिक पंडय़ा अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी करीत आहेत.
गोलंदाजीत युवा फिरकी गोलंदाज मयांक मरकडेवर मुंबईची भिस्त आहे. फॉर्मात असलेल्या जोस बटलरला रोखण्याची क्षमता त्याच्यात आहे. याशिवाय जसप्रीत बुमरा, हार्दिक, मिचेल मॅक्क्लिनॅघन, कटिंग आणि कृणाल ही गोलंदाजीची फळी त्यांच्याकडे आहे. या परिस्थितीत अपेक्षित कामगिरी न करू शकणाऱ्या किरॉन पोलार्डला मात्र संघात स्थान नाही.
राजस्थानचा सलामीवीर बटलरने मागील चार सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. मात्र सूर हरवलेल्या रहाणेकडून संघाच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी आणि राहुल त्रिपाठी यांच्यासारखे खेळाडू राजस्थानच्या संघात आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट अद्याप अपेक्षांची पूर्तता करू शकले नाहीत.
- सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.
