Nepal vs Scotland Highlights:आयसीसी मेन्स वर्ल्डकप स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. २ जून रोजी झालेल्या सामन्यात नेपाळ आणि स्कॉटलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.या दोन्ही संघांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक सामना रंगला आहे. शेवटचा चेंडू पडल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंना वाटलं की, आपला संघ जिंकला आहे. मात्र, निकाल काही वेगळाच लागला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडने ५० षटकांत ७ गडी बाद २९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेपाळ संघातील फलंदाजांनीही पूर्ण जोर लावला. नेपाळच्या फलंदाजांनी ४९.५ षटकापर्यंत २९६ धावांची बरोबरी केली. त्यामुळे नेपाळला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर १ धाव घ्यायची होती. तर स्कॉटलंडला हा सामना ड्रॉ करण्यासाठी निर्धाव चेंडू टाकायचा होता. शेवटच्या चेंडूवर जोरदार ड्रामा पाहायला मिळाला.
अंपायरच्या एका निर्णयामुळे फिरला सामना
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात स्कॉटलंडकडून डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी मार्क वॉट गोलंदाजीला आला. त्यावेळी नेपाळचा फलंदाज करन केसी स्ट्राईकवर होता. नेपाळला सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज होती. त्यावेळी मार्क वॉटने लेग स्टम्पच्या दिशेने चेंडू टाकला. करन केसीने या चेंडूवर फ्लिक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न फसला. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. दोघेही फलंदाज धाव घेण्यासाठी धावले. यष्टीरक्षण करत असलेल्या मॅथ्यू क्रॉसलाही हा चेंडू व्यवस्थित पडकता आला नाही. पण त्याने चेंडू पकडला आणि यष्टी उडवली.
यष्टी उडवताच स्कॉटलंडच्या खेळाडूंना वाटलं की सामना ड्रॉ झाला आहे. खेळाडूंनी जल्लोष करायला सुरूवात केली. पण ज्यावेळी खेळाडूंची नजर अंपायरकडे गेली, त्यावेळी त्यांना जाणवलं की अंपायरने हा चेंडू वाईड चेंडू घोषित केला आहे. या निर्णयानंतर नेपाळचे खेळाडूही जल्लोष करताना दिसून आले.
या विजयानंतर नेपाळच्या खेळाडूंनी मैदानाच्या दिशेने धाव घेतली. खेळाडू नेपाळचा झेंडा घेऊन मैदानात आले. नेपाळसारख्या नवख्या संघाने स्कॉटलंडसारख्या संघाला पराभूत करणं ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खेळाडूंचा गगनात मावेनासा झाला.